रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश खो-खो, कबड्डी, कराटे, ज्युदो आणि धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; दीप म्हात्रेची मुंबई विभागीय स्तरावर निवड
रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
खो-खो, कबड्डी, कराटे, ज्युदो आणि धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; दीप म्हात्रेची मुंबई विभागीय स्तरावर निवड
प्रतिनिधी | आवरे (हिमांशू पटेल)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढतो. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स, आवरे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या आयोजनाखाली सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ मध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय सांघिक स्पर्धांमध्ये १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या गटात खो-खो स्पर्धेत विद्यालयाच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या गटातील काव्य सुशांत गावंड याचा मैदानी निवड चाचणीत समावेश करण्यात आला आहे.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात कबड्डी व खो-खो स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या संघांनी द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्येही विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही योगेश घरत हिने १७ वर्षांखालील ६८ किलोखालील वजनी गटातील कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज म्हात्रे याने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयातील १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी घनश्याम म्हात्रे हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जान्हवी पराग गावंड हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात निधी बाळू गावंड हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत श्रीयांश हर्षद भुरे याने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांच्या ५० किलोखालील वजनी गटात कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी दीप धनेश्वर म्हात्रे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या ४४ किलोखालील वजनी गटात आरोही संतोष म्हात्रे हिने तृतीय क्रमांक, १७ वर्षांखालील मुलींच्या ५७ किलोखालील वजनी गटात वैष्णवी गुरुनाथ गावंड हिने द्वितीय क्रमांक, तर ४४ किलोखालील वजनी गटात दीक्षा लक्ष्मण पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, खानिनदार डॉ. सुखदा चिराटे, प्राचार्या मेघा म्हात्रे, डॉ. समृद्धी मोरे, रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत