Contact Banner

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात गळा दाबून हत्या केल्याची पतीची कबुली साकळी येथून पोलिसांनी घेतले ताब्यात;

 

wife-murdered-over-character-suspicion-yawal-husband-confesses


पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात गळा दाबून हत्या केल्याची पतीची कबुली

साकळी येथून पोलिसांनी घेतले ताब्यात; 




लेवाजगत न्यूज यावल :पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील तिरुपती नगर परिसरात घडली. या प्रकरणातील संशयित पती फरदीन खान आरिफ खान (वय २१) याला पोलिसांनी साकळी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त समोर आले आहे.


मशीराबी फरदीन खान (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. फरदीन आणि मशीराबी हे दाम्पत्य यावल येथील तिरुपती नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी दुपारी घरातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात फरदीनने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचे कबूल केल्याची माहिती आहे.


पोलिसांनी साकळी येथून ताब्यात घेतल्यानंतर फरदीनने पत्नीच्या चारित्र्यावर आपल्याला संशय होता, तसेच पत्नीही आपल्यावर संशय घेत असल्याचे सांगितले.  याच कारणावरून सोमवारी दुपारी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या वादातून रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे वृत्त आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. घटनेनंतर घटनास्थळावरून निघून गेलेल्या संशयित पतीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला साकळी परिसरातून ताब्यात घेतले.


या घटनेमुळे यावल शहरातील तिरुपती नगर परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या २० वर्षांच्या विवाहितेचा संसार अशा प्रकारे संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी यावल पोलीस पुढील तपास करीत असून, हत्येमागील सर्व बाबींचा तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.