Contact Banner

कोरोना नंतरचे जग...वैशाली झोपे अंबरनाथ

कोरोना नंतरचे जग...

           विश्वविधात्याने अतिशय सुंदर जग निर्माण केले.त्याने ते निर्माण करतांना सजीव आणि निर्जीव, तसेच डोळ्यांनी दिसणारी आणि न दिसणारी सृष्टी निर्माण केली. न दिसणारे लहान लहान जीव, सजीव असो वा निर्जीव साऱ्यांना घातक ठरतात.पण काही उपयोगी देखील असतात. असाच एक सुक्ष्मजीव ज्याला आपण कोव्हिड-१९ असे म्हणत आहोत त्याने जगभरात अगदी उच्छाद मांडला आहे. हा विषाणू एवढ्या झपाट्याने वाढत आहे की त्याला आवर कसा घालावा तेच कळत नाही.काही देशांनी तर अक्षरशः हात टेकले आहेत. तसे बघितले तर कोरोना विषाणुचा इतिहास नऊ दशकांचा आहे.१९३०च्या दशकात हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळला. नंतर १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. पण तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्याचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही. तो पुन्हा २००३ मध्ये सार्स( svere acute respiratory syndrome- SARS)या स्वरुपात प्रकटला तेव्हा तो वटवाघुळात आणि मानवात आढळला नंतर २०१३ मध्ये मार्स कोरोना विषाणू सौदी अरेबियात व इतर मध्य पुर्व देशात झालेला आढळला. पण त्यावेळी त्याच्या उद्रेकाची गती जास्त नव्हती आणि आता २०१९ मध्ये हा मानवनिर्मित कोरोना विषाणू वेगळ्या रुपात अवतरला.खरतर कोरोनानंतर जग कसे असेल याची तर कल्पनाही करवत नाही. बऱ्याच देशात तर मुळात लोकसंख्या कमी आहे आणि या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनानंतर बदल तर खुप झालेला असेल. काही चांगला तर काही बदल हा कल्पनेपलिकडचा असेल.
        कोरोनानंतर सर्वच देशांची आर्थिक स्थिती खालावलेली असेल. देशांचा विकास दरही खाली उतरलेला असेल. त्यामुळे सहाजिकच भावी पिढी साठी अनेक समस्या निर्माण होतील. देशामध्ये आर्थिक मंदी निर्माण होणार, उद्योग धंद्यांची स्थिती बिकट झालेली असेल. त्यामुळे सरकारने कितीही सांगितले की, कोणाच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही तरी जर उद्योगधंदे डबघाईला आलेले असतील तर मालक मंडळी रोजगारांना रोजगार पुरवतील तरी कुठून आणि कसे? सर्वच देशांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढतच आहे. अनेक असे कामगार आहेत की, जे दिवसभर राबराब राबतात आणि संध्याकाळी त्यांना रोजगार मिळाला की, ते त्या पैशातून पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी आणि रेशन आणतात. ते कदाचित कोरोना या विषाणूने मृत्युमुखी पडणार नाही पण उपासमारीने नक्कीच मृत्यु पावतील. काहींनी पै पै जमा केलेली मुलांच्या भविष्यासाठीची तुटपुंजी या लॉकडाऊनच्या काळात वापरली जाईल. अश्या घरांमध्ये त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय झालेले असेल. अनेक समस्या आ वासून उभ्या असतील.बेरोजगारीमुळे चोरी, लुटमारीच्या प्रमाणात वाढ झालेली असेल.देशात आर्थिक मंदीमुळे अनेक तरुण पिढीला आपल्या नोकरीला मुकावे लागेल. कदाचित त्यातील बऱ्याचश्यांनी घर किंवा गाडी घेतलेली असेल त्याचे हप्ते भरण्यासाठी पैसे असणार नाही. त्याचा परिणाम असा देखील होऊ शकतो की, ही तरुणपिढी डिप्रेशन किंवा आत्महत्या या साऱ्यांच्या भोवऱ्यात अडकेल.
       लहान मुले असो वा मोठी यांच्या परिक्षा रद्द झाल्या . तसेच ते बाहेर खेळायला जाऊ शकत नाही त्यामुळे ते सतत मोबाईल किंवा टि.व्ही.बघत आहे. यामुळे मुले मोबाईल,टि.व्ही.च्या आहारी गेलेले असतील.पुन्हा त्यांच्या या सवयी सोडवणे खुप त्रासदायक होणार आहे. बऱ्याच मुलांचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे.असे करत असतांना बऱ्याच मुलांकडे तर स्मार्ट फोन नाही.असे मुलं शिक्षणापासून वंचित रहातील.तसेच काही वेळा तर रेंज नसते त्यामुळे तो भाग त्यांना कळत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षातील नाते दूर होत जाईल. शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्षात समोरासमोर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग किती आकलन झाला आहे ते समजणार नाही.खुप वेळा असेही होते की,हवी ती साईट उघडत असतांना नको ते दृष्य समोर येते याचा मुलांच्या मनावर भयंकर परिणाम होणार आहे. आरोग्यासाठी नैसर्गिक हवा आणि ऊन यांची देखील आवश्यकता असते. पण सध्या लॉकडाऊनने घरातच रहावे लागत असल्याने या साऱ्या गोष्टींना मुकावे लागत आहे.घरात बसून बसून अनेक दुसरेच आजार मागे लागतील. मानसिकताही बिघडलेली असणार. नातेसंबधही दुरावलेले असतील. हल्ली तर अश्याही बातम्या येत आहेत की, नवरा बायको यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. कोरोनानंतर जगात जवळपास सत्तावीस कोटी जनता भुकबळीच्या वाटेवर असणार. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडणार.
       सध्या या कोरोना सोबत साऱ्या देशांना त्रासदायक ठरणारा प्रश्न आहे तो म्हणजे प्रदुषण. कोरोनानंतर जगातील प्रदुषणचे प्रमाण कमी झालेले असेल. कारण या विषाणुच्या फैलावाच्या काळात अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कारखाने बंद ठेवण्यात आले. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव असल्यामुळे वाहनांचा वापर खुप कमी प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे हवेचे, आवाजाचे प्रदुषण कमी प्रमाणात होत आहे.नद्यांचे पाणी स्वच्छ होत आहे.वसुंधरा छान हिरवाईने नटले. ठिकठिकाणी थुंकण्यावर बंदी आली आहे त्यामुळे तंबाखू,गुटखा,पान खाऊन रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, भिंती या ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हे ठिकाण स्वच्छ झालेले असतील. माणसांना अनेक स्वच्छतेच्या सवयी लागतील. लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी काही दुकाने बंद आहेत. त्यामुळे माणसांना काटकसरीची, वस्तुंचा जपून वापर करायची सवय लागेल. हॉटेल बंद असल्यामुळे घरात बनवलेले पोष्टिक जेवण जेवायची सवय लागतील. बरेच जण आता घर कामातही मदत करायला लागलेत,स्वत: स्वत:ची कामे करायची सवय लागेल.बरेच जण नियमित आंघोळ करत नाही अश्यांना नियमित आंघोळ करायची सवय लागेल. तसेच रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायची सवय लागेल. वाढदिवस साजरे करतात तेव्हा एकमेकांचा उष्टा केक खातात,तसे एकमेकांचे उष्टे न खाण्याची सवयी लागतील. काही जण वॉश रुमला जाऊन आल्यानंतर हात पाय न धुणे, बाहेरुन आल्या नंतर देखील हात पाय न धुणे या सवयी आहेत, त्या आता लागतील. एकमेकांना हात जोडून नमस्कार करतील. शिंकतांना आणि खोकतांना तोंडावर रुमाल धरतील.काही आजार असतील तर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधतील. या आणि अश्या कित्येक आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतील. लॉकडाऊनमुळे काही लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत अश्या लोकांना अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत माणुसकीचे दर्शन घडत आहे.
       हा काळ काही दिवसांसाठीचा आहे.पण त्यांनतर मात्र अमुलाग्र बदल झालेला असेल.

जगाला लागले ग्रहण
आहे हे काही क्षण
सुर्य ही ग्रासतो
पुन्हा तेजाने तळपतो
अवसही लागते चंद्राला
पौर्णिमेला पुर्ण बिंबतो
ग्रीष्मात धरा दुभंगते
वर्षा ऋतूत हिरवाईने नटते
अंधारात सृष्टी बुडाली
रवीकिरणाने पुन्हा तेजाळते
दु:खानंतर सुख हे येत असते
धैर्याने सारे पार पाडायचे असते


                          लेखक
         सौ वैशाली झोपे,अंबरनाथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.