आदरणीय देवस्वरूप कोव्हिड योध्यांनो सा.न.वि.वि.
आदरणीय देवस्वरूप
कोव्हिड योध्यांनो
सा.न.वि.वि.
पत्र लिहिण्यास कारण की,
आज काल या महामारीच्या काळात प्रत्येक जण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. 2020 हे वर्ष तसे फक्त आणि फक्त सर्व्हाव्हल इअर आहे. पण तुमच्यासारखे देवदूत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करत आहात .त्यासाठी शतशः प्रणाम. हे विश्व तुमचे ॠणी आहे..तुमच्यासारखे कोव्हिड योद्धे आज काम करताहेत म्हणून तरी आमच्यासारख्या लोकांना विश्वास वाटतोय की अजून आयुष्य आहे. आमच्या काॅलनीत पेशंट निघाला म्हणून घाबरणारे आम्ही लोक आणि प्रत्यक्ष पेशंटसोबत काम करणारे तुम्ही लोक..किती फरक आहे दोघांमध्ये याच फरकाने आम्ही तुम्हाला देव मानतो. जणू काही पंढरीचा विठोबा, शिर्डिचे साईबाबा, सर्व देवदेवता आपापली मंदिरे सोडून तुमच्या रूपाने रस्त्यारस्त्यावर उतरलीत आपल्या भक्तांसाठी...
तुम्ही ही कुटुंब वत्सल आहात. दरवाजात ऊभी राहून तुमची वाट बघणारी चिमुकली पाखरे आहेत. तुमच्यासाठी देवघरात दिवा लावून साकडे घालणारी तुमची जीवनसंगिनी आहे ...तर थरथरत्या हाताने तुमच्यासाठी नामस्मरण करणारेही थकलेले डोळे तुमच्या वाटेकडे नजर लावून असतात. पण आज तुम्ही या देशाला आपल कुटुंब मानलत. दरवाजातूनच तुमच्या बाळाशी दोन शब्द बोलून तुम्ही निघतात आमची घर सावरायला...होतात आधार डबडबलेल्या डोळ्यांचा ....
स्वॅब देतांना घाबरलेले आम्ही तुमच्या दोन शब्दांनी किंवा एका प्रेमळ नजरेनेच आश्वस्त होतो ...
आणि कोरोनाग्रस्त पेशंट व त्यांच्या कुटुंयांसाठी तर यमदेवता व पेशंट मधील भकूकम भिंत वाटतात. एखादि वस्तू बाजारांत आणल्यावर दहा वेळा धुणारे आम्ही अन रोज सकाळी घराघरातून कचरा घेऊन जाणारे सफाई कर्मचारी..लोकांच्या जीवासाठी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करणारे पोलिस मित्र सारेच देवदूत ...सर्वांच्या घरच्या. चूली पेटत्या रहाव्या म्हणून दुकान उघडून बसणारे किराणा दुकानदार, भाजीवाला, शेतकरी, पोस्टमन सगळेच देवस्वरूप भासताहेत.
खूप लिहायचय पण डोळे पाझरताहेत आता. जणू काही ते पण तुम्हा योद्ध्यांच्या चरणस्पर्शासाठी आतुर झाले आहेत ...
एवढ मात्र नक्की यापुढे आमची देवाची व्याख्या बदललेली असेल....
तुमच्या कार्याला लाखो सलाम...
लेखक
माधुरी चौधरी औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत