Header Ads

Header ADS

भारताचे थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ .ए.पी .जे अब्दुल कलाम -लेखक -संध्या भोळे

 


भारताचे थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ .ए.पी .जे अब्दुल कलाम -लेखक -संध्या भोळे

 आज , वाचन प्रेरणा दिन ,या दिनाच्या सर्वांना खुप सार्‍या शुभेच्छा....! 

 भारताचे थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ .ए.पी .जे अब्दुल कलाम  यांचा १५  ऑक्टोबर हा जन्मदिवस  त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी , त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व  मुलांना वाचनाचे महत्त्व कळावे , या उद्देशाने 'वाचन प्रेरणा दिवस ' म्हणून साजरा केला जातो.

        ' ग्रंथ आमचे गुरु

                     ग्रंथ आमचे संहारू!

           ग्रंथांमधूनीच तरू

                       अवघा भवसागरू!

           ग्रंथांच्या तेजातूनी, 

                       उजळती अंधाराच्या राती!

              ग्रंथांमुळेच लाभती,

                           सदा मार्गदर्शक साथी!

  वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे. वाचन हा मने घडिवणारा सुसंस्कारच ,वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार ,शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा ,वैज्ञानिक दृष्टिकोण वाढविता येतो. पण आजची तरुण पिढी मोबाईल व दूरदर्शन भोवती केंद्रित झालेली दिसते . तासनतास मोबाईल बघणारी माणसं चार ओळी वाचायलाही तयार नाही, म्हणून पुन्हा सांगण्याची वेळ आली ....

            " वाचाल तर, वाचाल! "

    'दिसांमाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे !' या समर्थ रामदास स्वामींच्या  ओळी खूप काही अर्थ सांगून जातात .कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर, वाचन खूप मोलाचे आहे .

      ज्येष्ठ साहित्यिक वि. स .खांडेकर म्हणतात, 'वाचनाने माझ्या जीवनातील आनंदाचा क्षणांमध्ये अधिक सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी जगण्याचे सामर्थ्य वाचनानेच दिले !'

           "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती "! 

  या उक्तीप्रमाणे जीवनाचं सारं सांगणारी अनेक पुस्तके ज्ञानाचा ठेवा वाढवितात. पुस्तके वाचतांना आपल्या आजी आजोबांच्या डोळ्यांत नकळत पाणी येतांना दिसते, कारण त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेल्या असतात .आज जरी E-Book, Kindle  स्वरूपात सहज पुस्तके उपलब्ध होत असली तरी, पुस्तक हातात  घेतल्याशिवाय समाधान होत नाही. 

          वाचूया पुस्तके,

                   वेचूया ज्ञान!

          करू जगणं समृद्ध 

                       साधूया कल्याण! 

          घेऊनी वाचनरूपी वसा

                       उमटवूया  प्रगतीचा ठसा! 

            वाचाल तर यशस्वी वाटचाल कराल . वाचनाने श्रीमंतीची नवीन दारे उघडतात ही श्रीमंती असते.....विचारांची, मानसिकतेची, राष्ट्र उभारणीची आणि सामाजिक जाणीवेची !

       ' It  builds our characters ! 

वाचनाने व्यक्तिमत्वास सुदृढता येते,  आपण प्रत्येक व्यक्तीला भेटलेलो नसतो पण त्या व्यक्तींच्या विचारांना वाचता येते, ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. म्हणून पुस्तकांशी मैत्री करा. 

          " Books are the carriers     of civilization .....They are companions, teachers, magicians, bankers of the treasures of the mind, books are humanity in print "

           _ Barbara w. Tuchman. 


संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचं काम केवळ पुस्‍तकेच करू शकतात.

      प्रसिद्ध लेखक रॉबीन शर्मा  म्हणतात,  'मी  केवळ पुस्तके वाचूनच श्रीमंत झालो आहे ,आम्ही यशस्वी होण्यासाठी वाचन केलं आणि आता यशस्वी राहण्यासाठी वाचन करीत आहोत '.

       रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय, जे शिक्षण आपल्याला नुसती माहिती देत नाही तर आपलं अस्तित्व सर्व घटकांशी  जोडते तेच खरे शिक्षण आहे. वाचन आणि त्यांचा विचार यामुळे आपण आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकतो ,त्यासाठी प्रत्येकाने आपली  वाचनाची भूक वाढवायला हवी .

      डॉ .ए .पी. जे. अब्दुल कलाम हे फार मोठे वाचन व ध्येयवेडे होते .लहानपणी पक्षी उडताना बघून पक्षी कसे बरे उडतात ?या विचारांनी पुढे जाऊन त्यांनी स्वत:विमान तयार केले,क्षेपणास्त्र बनविले  व मिसाईल मॅन म्हणून जगाला ओळख दिली. ते म्हणतात , ' स्वप्ने ती नसतात  जी आपण झोपेत पाहतो ,तर स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही ' 

      ' Low aim is crime !'. असे त्यांचे म्हणणे होते  त्या उच्चकोटींच्या ध्येयांप्रतीच  ते जगले आणि   खऱ्या स्वप्नांचा अर्थ त्यांनी जगाला  शिकवला.

        शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमीका  अतुलनीय असते ,म्हणून  आपली ओळख एक शिक्षक म्हणूनच राहावी अशी त्यांची दृढता होती. ते म्हणतात, अविरत वाचन करणारा माणूस मौनी बनतो ,आपल्या विचारांचे अवलोकन करण्याची सिद्धता त्याच्याजवळ येते .

आज प्रत्येक घरात देवघराप्रमाणेच ग्रंथ घर असावे कारण " A room without books is a body without soul !"

      वाचन संस्कृती जपायची असेल तर, वाचकवर्ग वाढला पाहिजे .माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे याचा वापर केला पाहिजे .

          चला तर मग, 

          आपणा सर्वांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी ,वाढवण्यासाठी  पुस्तके वाचूया ,पुस्तके भेट देऊ या! पुस्तकांचे जग समृद्ध करून वाचन चळवळ सशक्त करूया....! या दिवशी  वाचनसंबंधी विविध उपक्रमांत सहभागी होऊन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या महान कार्याचा गौरव करूया, हीच या महापुरुषाला आपणा सर्वांची खरी श्रद्धांजली असेल....! 

                              

    ©️ सौ. संध्या भोळे, भुसावळ







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.