जुन्या वादातून चुलत भावानेच केला खून तीन दिवसांत खुनाचा उलगडा, एकाला अटक
जुन्या वादातून चुलत भावानेच केला खून
तीन दिवसांत खुनाचा उलगडा, एकाला अटक
वृत्त संस्था शिरपूर-शिरपूर तालुक्यातील निमझरी ते सामयापाडा गावाच्या दरम्यान १५ फेब्रुवारीला मध्यरात्री संजय बोंगऱ्या पावरा (वय ३०) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला होता. हा गुन्हा शिरपूर शहर पोलिसांनी उघडकीस आणला. संजयच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ दरबार कुमारसिंग पावरा (वय २६) याला अटक केली आहे. जुन्या वादातून दरबारने संजयचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, मृत संजय भोग्या पावरा याच्या वडिलांना संशयित आरोपी दरबार कुमारसिंग पावरा याने १५ हजार रुपये उसनवार दिले होते. हे पैसे परत मिळवण्यासाठी दरबारने मृत संजय आणि त्याच्या वडिलांकडे तगादा लावला होता. त्यातून वर्षभरापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून तिघांमध्ये धुसफुस सुरू होती. पैसे मिळत नसल्याने दरबारने मृत संजयच्या वडिलांची जमीन गहाण ठेवली होती. जमीन गहाण ठेवण्यास मृत संजय आणि त्याच्या पत्नीचा विरोध होता. पण वाद विकोपाला जाऊ नये म्हणून जमीन दरबारकडे गहाण ठेवण्यात आली. त्यानंतरही दरबारच्या मनात संजय विषयी राग होता. काही दिवसांपासून दरबार संजयवर पाळत ठेवून होता. शहरातील निमझरी नाका परिसरातील एका हॉटेलवर संजय वेटरचे काम करत होता. त्याचा काही दिवसांपासून दरबार पाठलाग करत होता. दरबारने १५ फेब्रुवारीला रात्री शिरपूर - निमझरी रस्त्यावर संजयला थांबवले. तसेच मागील वाद उकरून संजयसोबत वाद घातला. वाद सुरू असताना दरबारने संजयच्या डोक्यात दगड घातला. तसेच त्याला फरफटत नेत पुलाच्या खाली फेकून दरबार घरी निघून गेला. त्यानंतर संजयचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयचे वडील भोंग्या खेत्या पावरा (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर अज्ञात मारेकऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या चौथ्या दिवशी मृत संजयचा चुलत भाऊ दरबारला अटक केली. दरबारने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, सी. बी. पाटील, पोलिस अधिकारी संदीप मुरकुटे, छाया पाटील यांनी कसून चौकशी केल्यामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. हेडकॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, रूपेश गांगुर्डे, तुकाराम गवळी, विनोद अखडमल, प्रवीण गोसावी, गोविंद कोळी, मुकेश पावरा, मनोज दाभाडे, अनिलअहिरे, प्रशांत पवार, सुरेश महाले, रोशनी पाटील यांनी सहकार्य केले.
दोघांचे मोबाइल केले ट्रेस
या घटनेचा कोणताही पुरावा नसताना पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनेच्या मागची पार्श्वभूमी तपासली. तसेच मृत संजय पावरा व संशयित आरोपी दरबार कुमारसिंग पावरा यांचे मोबाइल ट्रेस केले. त्यामुळे गुन्हा उघडकीस आला. त्यास अटक झाली असून, २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत रवानगी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत