महिला दिन विशेष- स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास - सायली महाजन(खडका,भुसावळ)
महिला दिन विशेष - जन्म म्हणून न व्हावे उदास - सायली महाजन(खडका,भुसावळ)
महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कासोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून ,आपल्या कर्तुत्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे.महिलांच्या हक्काचे रक्षण आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा ट्रेंड सेट झालाय. सन्मान झालाच पाहिजे, त्यापेक्षा ही तिच्या कर्तुत्वाला बळ देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही विचार व्हावा.१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता.
ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरवण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता. त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आठ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला.
महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांतील महिला दिन साजरा केला जातो तिच्या वाट्याला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहे याची गिनती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही जन्मदाता आई-बापांच्या संमतीने आणि आजी-आजोबांच्या, आत्या ,मामा यांच्या साक्षीने कदाचित आईच्या मनाविरुद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर की (हत्या?) मातृप्रेमाचं, वात्सल्याच्याही चिंधड्या उडवल्या जाताना तिला पाहावे लागते.
आपण महिलांना उडण्यासाठी संपूर्ण आकाश जरी मोकळं करून दिलं असल तरी आपण तिला पक्षी प्रमाणे उडू न देता तिला पतंगाप्रमाणे उडवून ते डोर आपल्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा करत आहोत. महिलांना उडू द्या मग आपली प्रगती निश्चित आहे.
बेटी दिल मे बेटी विल मे
तू होऊ नको सीता त्या रामाची लोक तुला अबला म्हणतील
तू होऊ नको द्रौपती त्या पांडवाची लोक तुला वैश्या म्हणतील
तू हो सावित्री त्या ज्योतिबाची लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील
तु हो माता त्या शिवबाची लोक तुला राजमाता राष्ट्रमाता म्हणतील.
सायली गणेश महाजन
युवाव्याख्यात्या
(खडका,भुसावळ)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत