टिटवाळा येथील धक्कादायक प्रकार:- आई-वडिलांची हत्या करून तो दोन दिवस मृतदेहांसोबत
टिटवाळा येथील धक्कादायक प्रकार:- आई-वडिलांची हत्या करून तो दोन दिवस मृतदेहांसोबत
लेवाजगत न्युज:- कल्याणजवळ टिटवाळा मांडा येथील पंचवटी चौकातील साई दर्पण इमारतीत धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे बहिणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अशोक भोसले (वय ७० ) त्यांची पत्नी विजया भोसले (वय ६०) आणि त्यांचा मुलगा अनमोल ( वय ३७) हे असे हे कुटुंब साई दर्पण इमारतीत राहत होते. अनमोलचे लग्न झाले आहे आणि तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. आई-वडील मयत झाल्याचे अनमोलने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्याच्या बहिणीला सांगितले आणि घरी बोलावून घेतले. अनमोलची बहीण घरी आली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आई-वडिलांचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. घरात दुर्गंधी येत होती. अनमोल त्यांच्या शेजारीच बसला होता. सगळच संशयास्पद वाटल्याने तिने याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या दोघांची हत्या त्यांचा मुलगा अनमोलने केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अनमोलला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यानेच चाकूने गळ्यावर वार करत या दोघांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अनमोल याला अटक केली आहे. कौटुंबीक वादातून अनमोलला नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून अनमोलने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्याने बुधवारी आपल्या आई-वडिलांची चाकूने वार करत हत्या केली असावी. दिवसभर तो दोघांच्या मृतदेहासोबतच होता. अखेर त्याने गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिलीं. पुढील तपास टिटवाळा पोलिस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत