Contact Banner

स्टेट बँकेच्या दणक्याने कर्जे महागली; होम-ऑटो लोन EMI चा बोजाही वाढणार, चेक करा डिटेल्स

 

 स्टेट बँकेच्या दणक्याने कर्जे महागली; होम-ऑटो लोन EMI चा बोजाही वाढणार, चेक करा डिटेल्स

लेवाजगत न्यूज:-रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेनेही आपल्या ग्राहकांवर कर्जाचा बोजा वाढवला आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेट लिंक्ड कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, १५ ऑगस्टपासून बाह्य बेंचमार्क (EBLR) आणि रेपो रेटशी (RLLR) जोडलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या ईएमआयवर होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनेही महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली होती. दरम्यान, एसबीआयने १५ ऑगस्टपासून एमसीएलआरमध्ये ०.२० टक्क्यांनी वाढ केली आहे.एमसीएलर वाढल्यानंतर एक वर्षाचा व्याजदर ७.७० टक्क्यांवर पोहोचला आहे, जो पूर्वी ७.५० टक्के होता. त्याचप्रमाणे, दोन वर्षांचा एमसीएलर ७.९ टक्के आणि तीन वर्षांचा ८ टक्के झाला आहे. सध्या, बँकेची बहुतेक कर्जे एक वर्षाच्या एमसीएलर दराशी जोडलेली आहेत.


बहुतेक बँका बाह्य बेंचमार्कशी जोडत आहेत

रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन करत स्टेट बँकेसह बहुतेक बँका ऑक्टोबर २०१९ पासून त्यांच्या कर्जाचे व्याजदर बाह्य बेंचमार्क किंवा रेपो व्याज दरांशी जोडत आहेत. यामुळेच आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरांवर होतो. यापूर्वी रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची वाढ थेट गृहकर्ज आणि वाहन कर्जाशी जोडली जात आहे.


आता व्याजदर किती?


भारतीय स्टेट बँकेने ५० बेस पॉईंट्स वाढवल्यानंतर बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जाचा व्याज दर म्हणजेच EBLR ८.०५ टक्के झाला आहे, तर रेपो रेट RLLR शी जोडलेल्या कर्जावरील व्याजदर ७.६५ टक्क्यांवर वाढला आहे. बँक या वर क्रेडिट रिस्क प्रीमियम देखील आकारते. म्हणजेच जर तुम्ही गृह किंवा वाहन कर्ज घेत असाल, तर या व्याजदरामध्ये क्रेडिट रिस्क प्रीमियम (सीआरपी) देखील जोडला जाईल.

EMI चा बोजा किती वाढेल?

जर तुमचे ३० लाखांचे गृहकर्ज ७.८ टक्के व्याजाने २० वर्षांसाठी चालू असेल, तर सध्याचा ईएमआय २४,७२१ रुपये असेल. अशाप्रकारे तुम्ही संपूर्ण कालावधीसाठी २९,३३,०६० रुपये व्याज म्हणून द्याल. तसेच आता बँकेने व्याजदरात ५० बेस पॉईंटची वाढ केली आहे, त्यामुळे प्रभावी व्याजदर ८.३० टक्के असेल. आता तुमचा ईएमआय २५,६५६ रुपयांवर येईल. म्हणजेच तुमचा खर्च दर महिन्याला ९३५ रुपये आणि वर्षभरात ११,२२० रुपयांनी वाढेल. हा व्याजदर पाहता नवीन गृहकर्जावर संपूर्ण कालावधीसाठी ३१,५७,४९० रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.