नाशिकमध्ये आणखी एका बसला आग : वणी मार्गावर अपघात, चालक-वाहकाने वाचवले प्रवाशांचे प्राण
नाशिकमध्ये आणखी एका बसला आग : वणी मार्गावर अपघात, चालक-वाहकाने वाचवले प्रवाशांचे प्राण
वृत्तसंस्था नाशिक- नाशिकमध्ये आणखी एका बसला आग लागली. एसटी महामंडळाच्या एका बसला आग लागल्याची माहिती समोर आली असून ही बस वणीकडे जात होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आज पहाटे लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर प्रवासी जखमी आहेत. यानंतर आज पुन्हा वणीच्या मार्गावर असताना लालपरीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एसटी बस नांदूर ते वणी गडावर जात होती. नवरात्रीसाठी जाणारी ही विशेष एसटी बस होती. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. इंजिनमध्ये सुरुवातीला धूर निघाला. ही बाब लागलीच एसटीचे वाहक आणि चालकाच्या लक्षात आली. त्यांनी सजगता दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर बसमध्ये असलेल्या फायर एक्स्टिंग्विशरने आग शमवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. बचाव पथकाने वेळेवर धाव घेऊन पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत