Header Ads

Header ADS

नाशिक खाजगी बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा जळून मृत्यू ,३८ गंभीर जखमी


नाशिक खाजगी बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा जळून मृत्यू ,३८ गंभीर जखमी

नाशिक खाजगी बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा जळून मृत्यू ,३८ गंभीर जखमी 

नाशिक लेवाजगत  न्यूज -नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात झाला. अपघातानंतर या बसमध्ये आग लागल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. यात जवळपास 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही बस यवतमाळवहून मुंबईला जाणारी खासगी बस असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

   चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. यानंतर ट्रॅव्हल्सच्या डिझेल टँकमध्ये आग लागली. पाहता पाहता अवघ्या बसने पेट घेतला. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, अतिशय भयंकर अशी ही आग होती. पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.

   चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक पुसद येथील नीरज जैस्वाल यांनी माध्यमांना सांगितले की, ही बस यवतमाळहून मुंबईसाठी काल दुपारी साडेतीनच्या सुमारास निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी होते. मला पहाटे पाच-साडेपाचच्या दरम्यान चालकाने फोन करून अपघाताची माहिती दिली. नातेवाइकांशी अद्याप संपर्क झालेला नसून त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. त्यांनी गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटही पूर्ण असल्याचा दावा केला. याशिवाय गाडीत फायर एक्स्टिंग्विशरही होते, असेही ते म्हणाले.

     याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील अशीही घोषणाही त्यांनी केली आहे.

     वाचा या दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलेली हकिगत...

   पूजा चव्हाण नावाच्या एका महिला प्रवाशाने सांगितले की, त्या त्यांच्या दोन मुलांसह बसमध्ये झोपलेल्या होत्या. अचानक त्यांना लोकांचा आवाज ऐकू आला आणि बसच्या समोर आग लागल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांसह खिडकीतून उडी मारली. यामध्ये त्यांचा हात भाजला असून त्यांची दोन्ही मुले सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. या भयंकर आगीतून वाचल्याबद्दल त्या म्हणाल्या की, मला जणू नवे जीवनच मिळाले आहे. आणखी थोडा वेळ झाला असता तर आमच्यासोबतही अनर्थ ओढवला असता.

    पूजा पुढे म्हणाल्या की, बसमधील बहुतांश जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले लोक बसच्या पुढील भागात होते. पहाटेचे 5:15 वाजले असल्याने बहुतांश प्रवासी साखर झोपेत होते, त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. एका माहितीनुसार, या आगीत 31 जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये बसचा चालक आणि काही मुलांचाही समावेश आहे.

     या दुर्घटनेबाबत माहिती देताना ट्रॅव्हल्समधील प्रवासी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील लोणी येथील अनिता सुखदेव चौधरी यांनी सांगितले की, मी झोपेत असताना बस आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत मी सीटवरून खाली पडले. यानंतर मला दिसले की बसच्या समोरच्या भाग आग लागली आहे. मी खिडकीतून उडी मारून माझा जीव वाचवला. सुदैवाने माझा जीव वाचला. वीस मिनिटांनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

      आणखी एक प्रवासी यवतमाळ येथील पिराजी सुभाष धोत्रे यांनी सांगितले की, मी माझ्या काका-काकूंसोबत कल्याणला जात होतो. सगळे झोपले होते. बसला लागलेल्या आगीमुळे काका भाजले आहेत. मात्र, वेळीच खिडकीतून उडी मारल्याने तिघांचेही प्राण वाचले.

     बसच्या पुढील भागात सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहाट असल्याने बहुतांश प्रवासी झोपलेले होते. त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. मृतांमध्ये बसचा चालक आणि काही मुलांचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला. मात्र, आग नेमकी का लागली, याबाबत खात्रीशीरपणे कोणी सांगू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.