औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार रिक्षा चालकानी मुलीला छळताच धावत्या रिक्षातून मुलीने घेतली उडी
औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार रिक्षा चालकानी मुलीला छळताच धावत्या रिक्षातून मुलीने घेतली उडी
वृत्त संस्था औरंगाबाद- ऑटोत बसलेल्या एकट्या मुलीला 'कुणासोबत फिरायला आवडते का?', असा प्रश्न विचारून विकृत रिक्षाचालकाने अश्लील बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्यासोबत काहीतरी विपरीत होणार, अशी धडकी भरल्याने मुलीने भरधाव रिक्षातून उडी मारली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
औरंगाबादेतील सिल्लेखाना चौकात 13 नोव्हेंबररोजी हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहे. पीडित मुलगी नेहाने (नाव बदलले आहे) घटनेबाबत कथन केलेली आपबीती तिच्याच शब्दांत...
पीडितेने सांगितले की, ‘उस्मानपुऱ्यात माझा क्लास आहे. वडील किंवा भाऊ मला राेज सोडवायला यायचे. रविवारी सकाळी सात वाजता पप्पांनीच सोडले. मात्र, काम असल्याने ते घ्यायला आले नाहीत. त्यामुळे मी रिक्षाने जाणार होते. क्लासपासून चालत गोपाल टी सेंटरपर्यंत गेले. तिथे एक रिक्षा माझ्यासमाेर येऊन उभी राहिली. आठ दिवसांपूर्वीच मी त्याच रिक्षाने घरी गेले होते, सोबत सहप्रवासी महिलाही होती. आम्ही दोघीही आपापल्या स्टॉपवर उतरलो. म्हणून रविवारीही मी फार विचार न करता त्या ऑटोत बसले. तेव्हा मात्र चालकाने इतर कुणीही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबवली नाही. रिक्षा सुरू झाल्यावर माझ्याशी तो गप्पा मारू लागला. ‘कोणत्या क्लासमध्ये जातेस ? कुठे राहतेस’ असे प्रश्न विचारू लागला. वडिलांच्या वयाचा माणूस होता, म्हणून मीही नॉर्मलपणे काही प्रश्नांची उत्तरे देत होते. पण मध्येच त्याच्यातील विकृतपणा दिसू लागला.
पीडितेने सांगितले की, ‘कुणासोबत फिरायला जायला आवडते का?’ असे विचारून आणखीही अश्लील काही प्रश्न विचारू लागला. मला एकदमच धडकी भरली. त्याच्या नियतीत खोट दिसून आली. मी त्याच्याशी बोलणे बंद केले. काय करावे सुचेना. त्याला विराेध केला किंवा काही बोलले तर तो आपल्याला पळवेल किंवा रिक्षा दामटील. मग सुटका होणार नाही असे अनेक विचार मनात येत होते. त्याच्या धास्तीने बॅगमधून मोबाइलही काढता येईना. मला समोर संकट दिसत होते. छातीत धडधड व्हायला लागली, अंग थरथरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार न करता मी सीटच्या एका कोपऱ्यावर सरकून काहीच विचार न करता सरळ रस्त्यावर उडी मारली. त्यानंतर डोळ्यांपुढे अंधारच होता. कुणीतरी तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा शुद्ध आली, डोळे उघडले तेव्हा काही जण मला रिक्षातून रुग्णालयात नेत असल्याची जाणीव झाली.’
घटनेनंतर नेहाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 तास तिची प्रकृती नाजूक होती. मंगळवारी थोडीशी सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून आरोपी सय्यद अकबरला अटक केली. सोमवारी दुपारीपर्यंत तिची प्रकृती नाजुक असल्याने नेमकी घटना स्पष्ट नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. रिक्षातून नेहा पडतानाचे फुटेज पाहिल्यानंतर क्रांती चौक पोलिसही हादरून गेले. गांभीर्य ओळखून निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी तत्काळ पथके रवाना करत रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक विकास खटके, अमोल सोनवणे, महादेव गायकवाड, मोहंमद एजाज शेख यांनी तपास सुरू केेला. गोपाल टी ते सिल्लेखाना व पुढे तब्बल ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात रिक्षाचा १५६२ क्रमांक कैद झालेला. मात्र, सिरीज अस्पष्ट होती. त्यामुळे आरटीओककडून माहिती घेत त्या क्रमांकाचे नऊ रिक्षाचालक ताब्यात घेतले. अखेर सय्यद अकबर हा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. अंमलदार संतोष मुदिराज, इरफान खान, नरेंद्र गुज्जर, संतोष सुर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांनी कारवाई पार पाडली.
पोलिसांनी सय्यद अकबरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा रिक्षा जप्त करण्यात आला. मूळ मालकाकडून तिसऱ्याने भाड्याने घेतलेला रिक्षा आरोपी चालवत होता. तो मूळ मुंबईचा असून त्याला तीन मुली आहेत. त्यापैकी मोठी मुलगी अठरा वर्षांची आहे. नेहाशी मी आक्षेपार्ह वाक्य बोलून गेलो, अशी निर्लज्ज कबुली त्याने दिली.
नेहाचे वडील सरकारी नोकरदार आहेत. ते म्हणाले, ‘मला तीन मुली आहेत. सगळ्याच हुशार आहेत. शिक्षणासाठी मुलींना एकटे जावे लागले, पण त्या अशा असुरक्षित असतील तर तर मुलींनी शिकावे कसे? माझ्या मुलीने रिक्षातून उडी मारली तेव्हा तिच्याजवळून एक कार गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नशीब चांगले म्हणून ती वाचली नाही तर आम्ही मुलगी गमावलीच असती. मुली दिवसाही सुरक्षित नसतील तर आईवडिलांनी शिक्षणासाठी पाठवलेल्या मुली किती भीतीच्या दडपणाखाली जगत असतील?’ असा गंभीर प्रश्न प्रतिनिधीसमोर विचारत असताना त्यांना रडू आवरले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत