बाजार समिती प्रारूप मतदार याद्यांची आज प्रसिद्धी
बाजार समिती प्रारूप मतदार याद्यांची आज प्रसिद्धी
लेवाजगत न्यूज सावदा- जिल्ह्यात लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी एकापाठोपाठ रंगण्यास सुरुवात झाली आहे. यात जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्यांची सोमवार, १४ रोजी प्रसिद्धी सहकार विभागाकडून केली जाणार आहे. त्यानुसार कृउबा समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीदेखील लवकरच बिगुल वाजणार असल्याचे संकेत आहेत.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग प्रतिबंधामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकार क्षेत्रातील सुमारे १११८ संस्थापैकी स्थानिक स्तरावर विकास कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून १० डिसेंबर रोजी होणार आहे.
यापाठोपाठ जिल्ह्यातील स्थानिक स्तरावरील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार संघाची प्रारूप मतदार याद्या सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात भडगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड वगळता जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, पाचोरा आणि चाळीसगाव या १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.
४ 'गटातून होणार १८ संचालकांची निवड
जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ४ गटातून १८ संचालक सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. यात सहकारी संस्था गटातून ११, ग्राम पंचायत गटातून ४, व्यापारी गटातून २ तसेच हमाल मापारी गटातून १ असे १८ सदस्य संचालक निवडले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत