अमेरिकेत समलैंगिकांच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी झाल्याची भीती
अमेरिकेत समलैंगिकांच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी झाल्याची भीती
विदेश वृत्त -अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री येथील एका समलैंगिकांच्या नाईट क्लबमध्ये बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त ‘मिरर’ने दिलं आहे.
या गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून जखमींना नाईट क्लबमधून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका तैनात केल्याचं दिसत आहे.
खरं तर, ट्रान्सफोबियामुळे (समलैंगिक संबंध विकृत भावना आहे, असं मानणे) खून झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी अमेरिकेत ‘ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबरन्स’ हा दिवस साजरा केला जातो. रविवारी रात्री कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील ‘क्लब क्यू’मध्ये हा दिवस साजरा केला जात होता. यावेळी एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी घटनेची पुष्टी न करता दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर व्यक्तीने स्नायपर रायफलचा वापर करून या ‘गे क्लब’वर हल्ला केला. या हल्ल्यात किमान १० लोकांना गोळ्या घातल्या आहेत. आरोपीनं हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला आणि या घटनेत नेमके किती लोक जखमी झाले आहेत? याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत