माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा मला अधिकार- अभिनेत्री उर्फी जावेद
माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा मला अधिकार- अभिनेत्री उर्फी जावेद
वृत्त संस्था मुंबई -माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी भारतीय नागरिक आहे. हा अधिकार मला संविधानाने दिला आहे. मी माझ्या आवडीचे आणि व्यावसायिक गरजेनुसार कपडे घालते. छायाचित्रकार माझे फोटो काढतात. त्यातील काही फोटो व्हायरल होतात. व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू शकते?’ असा जबाब अभिनेत्री उर्फी जावेद हिने मुंबई पोलिसांत शनिवारी नोंदवला आहे. पाेलिसांनी तिची दोन तास चौकशी केली.
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सध्या महाराष्ट्रात शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उर्फी जावेदचा पेहराव अश्लील असल्याचे सांगत रान उठवले आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावून जबाब नोंदवण्यास सांगितले होते. या नोटिसीनंतर उर्फीने आंबोली पोलिस ठाण्यात हजर होऊन जबाब नोंदवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैला कोराडे उर्फी जावेद प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची शुक्रवारी भेट घेतली होती. पोलिसांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तिंवर कारवाई करावी, अशी मागणी उर्फीने आयोगाकडे केल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते. दरम्यान, उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत