बोईसरमध्ये मनसे नेत्याची डॉक्टरला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड; ९ जणांना अटक
बोईसरमध्ये मनसे नेत्याची डॉक्टरला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड; ९ जणांना अटक
वृत्तसंस्था बोईसर: मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे याने आपल्या समर्थकांसह बोईसर येथील डॉ. स्वप्नील शिंदे यांना बेदम मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली आहे. या मारहाणीत डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मारहाण करणार्या समीर मोरे आणि त्याच्या समर्थकांवर बोईसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील शिंदे यांच्यावर शुक्रवार रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मनसेचे पालघर (ग्रामीण) जिल्हाप्रमुख आणि नांदगावचे सरपंच समीर मोरे आणि त्याच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण करत रुग्णालयाची देखील तोडफोड केली. या रुगालयात पूर्वी उपचार घेतलेल्या एका रुग्णाचे बील कमी करण्यावरून यांच्यात वाद झाला होता.
या वादात दोन दिवसांपूर्वी देखील समीर मोरे याने डॉक्टरांना मारहाण केली होती. यानंतर डॉक्टर शिंदे यांनी बोईसर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा समीर मोरे आणि त्याच्या समर्थकांनी मिळून डॉक्टर शिंदे हॉस्पीटलमध्ये घुसून डॉ.स्वप्नील शिंदे आणि कर्मचार्यांना धक्काबुकी करून बेदम मारहाण केली. या मराहाणीत डॉ.शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
डॉक्टरांना मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाठ, नित्यानंद झा यांनी स्वत:बोईसर पोलिस स्टेशनला भेट देऊन मारहाणीच्या घटनेची तात्काळ दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार बोईसरचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर यांनी आरोपी समीर मोरे, उल्हास मोरे, मयूर पाटील, सिद्धेश महाले यांच्यासह एकूण नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेत अटक केली असून त्यांच्यावर भां.दं.वि.कलम ३२६,१२०-ब, ४५२, १४३, १४६, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
बोईसरमधील शिंदे हॉस्पीटलचे डॉ. स्वप्नील शिंदे यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पालघर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन डॉक्टरांवरील वाढते हल्ल्याची गंभीर दखल घेऊन संरक्षण देण्याची तसेच मारहाणीमध्ये सामील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.
संबंधित प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपीसह आठ आरोपींना अटक केली आहे. अश्या स्वरूपाची यापुढे कोणी दहशत तयार करून गुंडगिरी केल्यास अश्या इसमा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत