Contact Banner

सैनिकहो तुमच्यासाठी…! उरण तालुक्यातील धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी भारतीय सैन्यासाठी दिले 5 लाख रुपयांचे योगदान

 

@lewajagat



सैनिकहो तुमच्यासाठी…!


उरण तालुक्यातील धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी भारतीय सैन्यासाठी दिले 5 लाख रुपयांचे योगदान

 

      उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनील ठाकूर ):- संपूर्ण समाज,देश आपल्या वीर भारतीय जवानांचा ऋणी आहे, त्यांच्यासाठी आपलेही काही कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण कोणत्याही चांगल्या मार्गाने पूर्ण करु शकतो, ही भारतीय सैनिकांप्रतिची आदर भावना व्यक्त करुन स्वत:च्या वाढदिवसानिमित्ताने (दि.8 मार्च ) उरण तालुक्यातील धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी शुक्रवार, दि.3 मार्च 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) श्री.राहुल माने यांच्याकडे 5 लाख रुपयांचा धनादेश अलिबाग येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात सुपूर्द केला.

       यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोंविंदराव साळुंखे, ॲड.किशोर ठाकूर, कल्याण संघटक लालचंद कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील इतर अधिकारी - कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

        शहीद जवानांच्या कुटुंबियांचे कल्याण करण्यासाठी, युध्दात जखमी झालेल्या जवानांचे पुनर्वसन करण्यासाठी, सेवारत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, माजी सैनिक व दिवंगत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, सन 1919 च्या पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत झालेल्या विविध चकमकींमध्ये ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांनी त्यांचा आज आपल्या उद्यासाठी दिला आहे, याची जाणीव राहण्यासाठी, ही मूलभूत तत्वे जनमाणसांच्या मनात रुजविण्यासाठी ध्वजदिन साजरा करण्याची प्रथा आहे. या संकल्पनेतूनच ध्वजदिन निधी संकलनाचे काम सर्वत्र केले जाते. 

       याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) श्री.राहुल माने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जेव्हा सैन्यातील एक जवान एका कुटूंबातून सैन्यात जातो, त्यावेळी तो सैन्याच्या मोठ्या कुटुंबाशी जोडला जातो आणि हे  सैन्यरुपी कुटुंबच त्याच्यासह सर्वांची काळजी घेते. भावी पिढीला मानसिकदृष्टया सशक्त करणे, देशप्रेमासाठी प्रोत्साहित करणे,  त्यांना देश व समाजहितासाठी काम करण्याची प्रेरणा देणे,हाच ध्वजदिनासारख्या उपक्रमांचा उद्देश आहे. “स्फूर्ती, शक्ती, अभिमान” हा अशा उपक्रमांचा गाभा आहे. आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग आपल्या भारतमातेसाठी करणे महत्वाचे आहे. देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी बलिदान करणे नसून देशाचा प्रत्येक पैसा योग्य कारणासाठीच खर्च होणे, जबाबदारीने खर्च करणे, हे देखील महत्वाचे आहे. अधिकार म्हणजे जबाबदारी या भावनेने भारतीय सैन्य अहोरात्र काम करते. याच भावनेचा प्रामाणिक स्वीकार उरण तालुक्यातील धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी केला असून त्यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त भारतीय सैनिकांसाठी मागील वर्षी रु.5 लाख तसेच यावर्षी देखील रु.5 लाख ध्वजदिन निधी स्वरुपात देवून सर्वांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा आदर्श समाजातील विविध क्षेत्रातील लहानथोर व्यक्तींनी, संस्थांनी घेणे, ही काळाची गरज असून जास्तीत जास्त नागरिकांनी भारतीय सैन्य, माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी पुढे येवून शक्य ती मदत करावी, असे आवाहन केले.

      यावेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभेदार (निवृत्त) गोविंदराव सांळुखे यांनी ध्वजदिन निधी 2021 चे उद्दिष्ट्य रु.60.98 लक्ष इतके असताना रायगड जिल्हा प्रशासनाने रु.82.12 लक्ष (136.26%) इतके निधी संकलन करण्यात यश मिळविले असून त्यापैकी रु.22 लक्ष 88 हजार 398 इतका निधी कल्याणकारी योजनांसाठी 182 लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. सन 2022 मध्ये रुपये 75 लक्ष उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. ध्वजनिधीस दिलेली देणगी आयकर कायदा 1961 मधील कलम 80-जी नुसार (5) (vi) अन्वये 100% आयकर मुक्त आहे, असे सांगून ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, रायगड-अलिबाग, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड येथे प्रत्यक्ष किंवा 02141-222208 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.