धुळे-सुरत बसचा भीषण अपघात 7प्रवाशी जखमी
धुळे-सुरत बसचा भीषण अपघात 7प्रवाशी जखमी
लेवाजगत न्यूज नंदुरबार -जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बस अपघाताची घटना ताजी असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही भीषण बस अपघात झाला आहे. येथील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळे-सुरत बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक व एका कंटेनरने बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत.
आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत जखमींना खाजगी वाहनातून रूग्णालयात दाखल केले. अपघातात साक्री डेपोच्या धुळे-सुरत बसचे मोठे नुकसान झाले आहे.
धुळे- सुरत बस कोंडाईबारी घाटात उतारावर असताना हा अपघात झाला. या एकेरी वाहतूक असणाऱ्या रस्त्यावर बस, कंटेनर व ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच बस ही ट्रक व कंटेनरमध्ये आली व दोन्ही वाहनांनी बसला भीषण धडक दिली. या अपघातात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.
बसमध्ये एकूण 42 प्रवाशी होते. अपघातातून सात प्रवासी जखमी झाले आहेत. 108 रुग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दहिवेल ते नवापूरपर्यंतचा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे. यामुळे बरेच अपघात घडत असून हे काम कधी मार्गी लागेल, असा प्रश्न त्रस्त वाहनधारक विचारत आहेत. महामार्गावर कोंडाईबारी घाटात काही अंतरावर दुहेरी वाहतूक संपल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू होते. दुसरीकडे, येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी उतार रस्त्यावर वाहनांमध्ये वेग घेण्यासाठी चढाओढ दिसून येते. प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार बस, कंटेनर व ट्रॉल यांच्या ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.
आस्था हेमंत जडे (वय 14) रा. धुळे, पूजा अशोक सोनार (वय 24) रा. धुळे, भीमराव खंडेराव मोरे (वय 88) रा. दोंडाईचा, दिपाली किसन जगताप (वय 32) रा. सुरत, डॅनिश किसन जगताप (वय 6) रा. सुरत, पोपट सोनू सरग (वय 48), साक्री (बस चालक), अमृत सुभाष पाटील (वय 35) रा. साक्री (बस वाहक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत