११८ मिमी पाऊस अडीच तासात पडल्याने रावेरात हाहाकार ; माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता, दोघांचा बळी,गुरे वाहून मृत्यू
११८ मिमी पाऊस अडीच तासात पडल्याने रावेरात हाहाकार ; माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता, दोघांचा बळी,गुरे वाहून मृत्यू
लेवाजगत न्यूज रावेर-रावेर तालुका आणि सातपुडा परिसरातील २५ किमीच्या पट्ट्यात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रात्रीतून नद्या-नाल्यांना पूर आला. वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. रावेर शहरातील नागझरी नदीवरील अरुंद पुलावरून घराकडे परतणारे माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान, तालुक्यात अडीच तासांत ११८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रावेर तालुक्याला बुधवारी (दि.५) रात्री ९ ते ११.३० वाजेदरम्यान झालेल्या यंदाच्या पहिल्याच पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील नागझिरी नदीला पूर आला. यादरम्यान रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे काही अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे दुचाकीने जात होते.
यावेळी पुलावरून पाणी वाहत होते.मात्र या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाटील दुचाकीसह वाहून गेले. या घटनेच्या काही वेळ अगोदर निंभोरा (ता. रावेर) येथील एक दुचाकीस्वार पूल ओलांडत होता. पुरामुळे पुढे जाणे शक्य नसल्याने त्यांनी दुचाकी मध्येच सोडून कसाबसा जीव वाचवला. दरम्यान, सुधीर पाटील हे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यांच्या मोबाइलवर सुद्धा संपर्क होत नव्हता. यामुळे मुलाने सुधीर पाटील यांच्या दुचाकीस लावलेली जीपीएस सिस्टिम सुरू केली. त्यात पाटील यांच्या दुचाकीचे लोकेशन नागझिरी नदीवरील पुलाला लागून पश्चिम दिशेने दाखवत होते. यामुळे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराने सुधीर पाटील यांचा शोध सुरू केला. पण, पुरामुळे दुचाकी किंवा पाटील यांचा काहीही शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी प्रशासन व नातेवाईक मिळून सुमारे १५० जणांच्या तीन पथकाने जेसीबीने शोधकार्य सुरू केले. त्यात नागझिरी नदीवरील पुलाजवळ दोन दुचाकी सापडल्या. त्यापैकी एक दुचाकी पाटील यांची होती. पण, गुरुवारी सायंकाळपर्यंत सुधीर पाटील यांचा शोध लागला नाही. त्यात गुरुवारी सातपुड्यात पाऊस झाल्याने नागझिरी नदीला पुन्हा पूर येऊन शोधकार्यात अडथळे आले.
रसलपूरमध्ये मोटार वाहून गेली असून, त्यातील प्रवाशांनी उडी घेतल्याने सुदैवाने ते सर्व बचावले आहेत.तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईपोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रमजीपूरमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे चार गुरे, तर खिरोदा येथील १० ते १२ गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पुराच्या पाण्यात दहा बकरी, नऊ गायी आणि एक म्हैस वाहून गेली आहे, तर १४५ घरांची पडझड झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत