शेतातून पेरणी करून परत येताना शॉक लागून बैलजोडी गतप्राण शेतकऱ्यासह ७ जण लाकडी गाड्यामुळे बचावले
शेतातून पेरणी करून परत येताना शॉक लागून बैलजोडी गतप्राण
शेतकऱ्यासह ७ जण लाकडी गाड्यामुळे बचावले
लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील कोळवद शिवारात पेरणी आटोपून बैलगाडीने शेतकरी व शेतमजुरी घरी परत येत होते. यावेळी वीज खांबाच्या स्टे साठी लावलेल्या तारेला स्पर्श होवून बैलजोडी जागीच ठार झाली. सुदैवाने बैलगाडीतील शेतकरी व शेतमजूर असे ७ जण बालंबाल बचावले. स्टेच्या तारेत वीजप्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली.
कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे मंगळवारी सकाळी मजुरांना घेऊन पेरणीसाठी गेले होते. दुपारी काम आटोपल्यावर चौधरी व सहा मजूर असे ७ जण बैलगाडीत बसून शेतातून घरी परत येत होते. रस्त्यात शेतातील वीज वितरण कंपनीच्या खांबाला लावलेल्या तणाव ( पोल स्टे) च्या तारेला बैलाचा स्पर्श झाला. या तारेत वीजप्रवाह उतरलेला असल्याने बैलजोडी शॉक लागून जागीच गतप्राण झाली. मात्र, बैलगाडीत बसलेले शेतकरी व शेतमजूर असे ७ जण केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले. या घटनेबाबत वीज कंपनीला माहिती देण्यात आली.
शॉक लागून बैलजोडी दगावल्याने शेतकरी सुनील चौधरी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी झाली. तर वीज कंपनीने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले सर्वजण
बहुतांश शेतकरी शेती कामांसाठी ऐरवी लोखंडी बैलगाडी वापरतात. मात्र सुदैवाने सुनील चौधरी यांची बैलगाडी लाकडी होती. त्यामुळे वीजप्रवाह बैलगाडी उतरला नाही.. सर्व सात जणांचे प्राण केवळ यामुळे वाचल्याचे समोर आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत