पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा जागीच मृत्यू
पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा जागीच मृत्यू
लेवाजगत न्युज पालघर:- येथील पालघर जवळ 12956 जयपूर मुंबई सेंट्रल ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. गाडीच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. मात्र गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही पॅसेंजर सध्या मुंबई सेंट्रल स्थानकात पोहचली आहे. पोलीस पथक, रेल्वे पोलीस पथक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये पाहणी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने केलेल्या या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल करण्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. गोळीबार का केला, याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
कॉन्स्टेबलने हा गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांना उतरवत तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत