प्रा.डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
प्रा.डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
उरण (सुनिल ठाकूर ). रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे ( उरण ) येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील उपप्राचार्य व ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. महाले यांना विभाग प्रमुख पदाचा बत्तीस वर्षाचा अनुभव आहे. राज्य तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी संशोधनपर पेपर सादर केले आहेत. अभ्यासक्रमावर आधारित त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. याशिवाय ते महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर म्हणून गेले बत्तीस वर्ष काम पाहतात.
त्यांच्या मार्गदर्शनालाखाली मॅरेथॉन, अॅथेलिटिक्स या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. त्यांचे विद्यार्थी क्रीडा प्रकारातील नैपुण्यामुळे रेल्वे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व राज्यस्तरावर शंभरहून अधिक पदके विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करणारा प्राध्यापक अशी ओळख त्यांनी उरण परिसरात निर्माण केली आहे.
डॉ. महाले यांची अभ्यासक्रम मंडळावर निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील, प्राचार्य डॉ.पी.जे. पवार, भावनाताई घाणेकर, सुधीर घरत तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत