Header Ads

Header ADS

मृत्यूची REEL! पुलावरुन बाईक कोसळली, इंजिनीअरच्या डोक्यावर पडली, जागीच मृत्यू; कपल फरार


 मृत्यूची REEL! पुलावरुन बाईक कोसळली, इंजिनीअरच्या डोक्यावर पडली, जागीच मृत्यू; कपल फरार

लेवाजगत न्युज वाराणशी:- उत्तर प्रदेशातील वाराणसीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक जोडपं इन्स्टाग्राम रील तयार करत होतं. याच रील बनवण्याच्या नादात त्यांची दुचाकी उड्डाणपुलावरुन खाली पडली. या दुर्घटनेत एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यू झाला. दुचाकीवरुन प्रवास करणारे प्रेमी युगुल उड्डाणपुलावर रील बनवत होतं. रीलच्या नादात त्यांची दुचाकी उड्डाणपुलावरुन खाली पडली. ३० फुटांवरुन कोसळलेली दुचाकी कनिष्ठ अभियंत्यांच्या डोक्यावर पडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. अभियंत्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अभियंत्याचं वय २५ वर्षे होतं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. सर्वेश असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव असून तो वाराणसीच्या चोलापूरमधील गंजारी गावचा रहिवासी होता. तो उत्तर मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत होता. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून तरुण-तरुणीचा शोध सुरू आहे.

शिवपूरच्या चांदमारी परिसरात उड्डाणपूल आहे. दोन रस्त्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत तरुण-तरुणी रील बनवत होते. यावेळी रिंगरोडच्या वरुन त्यांची दुचाकी उड्डाणपुलावरुन खाली कोसळली. दुचाकी सर्वेशच्या डोक्यावर पडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त संतोष सिंह यांनी दिले आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची नोंदणी करण्यात आलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.