Contact Banner

अहमदनगर जिल्यात गुरांवर पुन्हा लंपीची बाधा सुरु

Lumpy-barrage-on-cattle-starts-again in Ahmednagar-district


अहमदनगर जिल्यात गुरांवर पुन्हा लंपीची बाधा सुरु 

लेवाजगत न्यूज अहमदनगर -जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी त्वचारोगाचा प्रादूर्भाव दोन महिन्यांपूर्वी कमी झाला होता. एप्रिल व मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात अ‌वघी 4 जनावरे बाधीत होती. परंतु, जूननंतर पुन्हा एकदा लंपीचा फैलाव झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत 582 जनावरे बाधीत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली.

    जिल्ह्यात 13.78 लाख गोवंश तसेच 2 लाख 21 हजार म्हशींची संख्या आहे. प्रामुख्याने गोवंशीय जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2022 मध्ये लंपी आजाराने एन्ट्री केली होती. या रोगाचा फैलाव झपाट्याने सुरू झाल्यानंतर सतर्क झालेल्या पशुसंवर्धन प्रशासनाने विविध उपाय योजना हाती घेतल्या होत्या. मागील वर्षी जनावरांच्या वाहतुकीवर बंधने आणली, तसेच बाजारही बंद केले होते. लंपी नियंत्रणात येतानाचे चित्र निर्माण झाल्यानंतर डिसेंबर 2022 पर्यंत बाजार पुन्हा सुरू केले. प्रभावी लसीकरणामुळे बाधीत जनावरांची संख्या जानेवारी 2023 पासून कमी होत गेली. जनावरांच्या शरिरावर गाठ आल्याचे दिसून आल्यास पशुपालकांकडून तत्काळ पशुधन अधिकाऱ्याला कळवले जाते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा, जनावरे पूर्ण बरी होईपर्यंत पाठपुरावा करतात. जिल्ह्यात 11ऑगस्ट ते 31 मार्च 2023 पर्यंत 4 हजार 371जनावरांचा मृत्यु झाला होता. तर जानेवारी ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत 48 जनावरांचा मृत्यु झाला. या दोन वर्षांत बाधीत जनावरांचा आकडा 57 हजार 387 वर पोहोचला आहे. एप्रिल व मे महिन्यात लंपी हद्दपार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, जूननंतर पुन्हा लक्षणे आढळून आलेली 582 जनावरे लंपी बाधीत झाल्याचे समोर आले. त्यात राहुरी, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात ही वाढ झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात पशुसंवर्धन विभागाने तब्बल 13.82 लाख जनावरांचे लसीकरण केले आहे.

    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे म्हणाले की, लंपी नियंत्रणासाठी आम्ही महिनाभरात 95 टक्के जनावरांचे लसीकरण केले. एप्रिलनंतर काही तालुक्यात लंपीची लक्षणे जनावरांमध्ये आढळून येत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 582 बाधीत जनावरांवर उपचार सुरू आहेत. प्रशासन सतर्क असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.