Header Ads

Header ADS

महापालिका वाहन विभागात इंधन चोरीचा घोटाळा; सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनिल बैसाने यांचा आरोप


 महापालिका वाहन विभागात इंधन चोरीचा घोटाळा; सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनिल बैसाने यांचा आरोप

 लेवाजगत न्युज धुळे:-धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) वाहन विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून इंधन चोरीच्या माध्यमातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गौप्यस्पोट भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी केला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या मागणीची महापौरांकडून देखील गांभीर्यानं दखल घेण्यात आली असून स्थायी समितीच्या सभेत देखील हा विषय चांगलाच चर्चेचा विषय ठरला. 

महापालिकेच्या वाहन विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून इंधन चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना काळात तब्बल 89 लाख दहा हजार रुपयांचं इंधन वापरलं गेलं असल्याचा गौप्यस्फोट स्थायी समितीचे माजी सभापती आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी केला होता. याप्रकरणी परिवहन समिती गठीत करावी, तसेच या विभागातील लॉक आणि स्टॉक बुक ताब्यात घ्यावं. तसेच, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणाची महापौर प्रतिभा चौधरी आणि स्थायी समितीच्या सभापती किरण फुलेवार यांनी देखील गांभीर्यानं दखल घेतली आहे. 

वाहन विभागासाठी महानगरपालिकेनं एसआरपीएफच्या पेट्रोल पंपाशी करार केला आहे. मनपाची वाहनं पेट्रोल पंपावर घेऊन जाण्याऐवजी वाहन विभागातील राऊत नामक कर्मचारी हा बॅरल पंपावर नेतो आणि इंधन भरून आणतो, ही बाब सुनील बैसाणे यांच्या निदर्शनात आल्यानंतर हा इंधन चोरीचा प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेचे तीन वर्षांपासून तब्बल 90 लाख 45 लाख आणि 14 लाख रुपये असं बिल आलं आहे. यामुळे महापालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार, आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती किरण कुलेवार यांनी देखील संबंधित राऊत नामक कर्मचाऱ्याची बदली करून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.