३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी आवाहन
३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी आवाहन
लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० जानेवारी, २०२४ पासून सुरु होणाऱ्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसाठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांकडून दिनांक १५ जानेवारी, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.
मराठी व्यावसायिक नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com https://mahanatyaspardha.com
या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका दि. १५ जानेवारी, २०२४ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २० जानेवारी ते २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.
जास्तीत जास्त व्यावसायिक नाटय संस्थांनी मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत