मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी ? खडसे की पाटील ?
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी ? खडसे की पाटील ?
लेवाजगत न्युज जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडली. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रंगत दिसून येत असून, जनतेनं कोणाच्या पारड्यात आपली मत टाकली आहेत याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय. राज्यातील २८८ जागांपैकी मुक्ताईनगर मतदारसंघाला राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. मागील काही वर्ष भाजपच्या तिकिटावर एकनाथ खडसे येथून निवडून आले होते. या मतदारसंघातून आता शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात थेट लढत आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतर्फे रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे. महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा जागा ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यातील एक जागा मानली जाते. येथे भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव गणपतराव खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांनी सलग सहा वेळा निवडणूक जिंकली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ खडसे यांचा हा विजयरथ थांबला. २०१९च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ राज्यात नावाने कमी आणि एकनाथ खडसे यांच्या नावाने जास्त ओळखला जातो. १९९० पासून भाजपला या जागेवर कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. १९९० ते २०१४ पर्यंत या जागेवर फक्त एकनाथ खडसे निवडणूक लढवत आहेत आणि जिंकत आहेत. मात्र, २०१९च्या निवडणुकीत असं काही घडलं की, ज्याची खडसेंनी कल्पनाही केली नसेल. या निवडणुकीत खडसे यांची कन्या रोहिणी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात चंद्रकांत निंबा पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या निवडणुकीत चुरशीची लढत असतानाही चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत