शाळेत घुसलेल्या रेड्याच्या हल्ल्यात १३ विद्यार्थी जखमी
रेडा शाळेत घुसल्याने १३ विद्यार्थी जखमी
लेवाजगत न्यूज छत्रपती संभाजीनगर -शहरातील एका शाळेत रेडा घुसल्याची घटना समोर आली आहे. रेड्याने केलेल्या हल्ल्यात शाळेतील १३ मुले जखमी झाली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा रेडा कुठून आणि कसा आला, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील टाऊन हॉल येथे मॉडेल इंग्रजी शाळेत बुधवारी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. परंतु, सकाळी साडे दहाच्या सुमारास एक रेडा अचानक शाळेत घुसला. रेडा शाळेत घुसल्यानंतर एकच धावपळ झाली. रेड्याच्या हल्ल्यात १३ मुले जखमी झाली. जखमी विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. रेड्याच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा पाय मोडला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत