बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार : लागोपाठ दुसऱ्या बळीमुळे नागरिक भयभीत
बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार : लागोपाठ दुसऱ्या बळीमुळे नागरिक भयभीत
लेवाजगत न्यूज यावल:-बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना आज घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वन खात्याने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता होत आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई या दोन वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेले. ती आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना बिबट्याने झडप घालून तिला उचलून केळीच्या बागेत पसार झाला. त्यांनी आरडाओरडा केला असला तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पसार झाला. तर या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिच्या शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री एकच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले.
या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागतो. यातच बिबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. ते सकाळी घटनास्थळी पीडित कुटुंबाची घेतील. काही दिवसांपूर्वीच किनगाव नजीक एक बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. या पाठोपाठ आता बालिका ठार झाल्याने परिसर हादरला आहे. वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत