Header Ads

Header ADS

वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी

 वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी

 लेवाजगत न्यूज यावल -तालुक्यातील डोंगर कठोरा आणि परिसरात आज, शुक्रवार, ६ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या खळ्यात बांधलेल्या बैलावर लिंबाचे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने सदर बैलाचे कंबरडे मोडल्याने गंभीर जखमी झाला आहे.


या घटनेमुळे सरपंच नवाज तडवी यांना मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच ४८ हजार रुपयांना हा बैल खरेदी केला आहे. ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात होण्यापूर्वीच बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या शेतीकामांना खीळ बसली आहे

या वादळी वाऱ्यामुळे डोंगर कठोरासह यावल तालुक्यात अनेक ठिकाणी केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, तलाठी गजानन पाटील आणि पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे काम केले. पंचनाम्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे.


ग्रामस्थांनी आणि शेतकरी वर्गाने शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. सरपंचांच्या बैलाच्या नुकसानीबद्दल त्यांना अर्थसहाय्य मिळावे, तसेच वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही तातडीने पीकनुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.