‘ताप्ती बेसिन’ प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘केळीचे सन्मानचिन्ह’ देऊन सत्कार
‘ताप्ती बेसिन’ प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘केळीचे सन्मानचिन्ह’ देऊन सत्कार
लेवाजगत न्यूज जळगाव राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आज जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आगमन झाले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत जिल्ह्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या दूरदृष्टीतून ‘बनाना बेल्ट’च्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या’ महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारदरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पामुळे रावेर, यावल, भुसावळ तालुक्यांतील सिंचन क्षमता लक्षणीय वाढणार असून, शेती उत्पादनात भरघोस वाढ होईल. शिवाय जलसंधारणाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जिल्ह्याच्या कृषी परंपरेचे व ‘बनाना बेल्ट’च्या ओळखीचे प्रतीक म्हणून आमदार जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘केळीचे प्रतीकात्मक सन्मानचिन्ह’ देऊन सन्मानित केले.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनुप अग्रवाल (धुळे), आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आमदार अनिल पाटील (अमळनेर) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत