इराणचा इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; १५० क्षेपणास्त्रांचा मारा, तेल अवीव व जेरुसलेममध्ये मोठे स्फोट
इराणचा इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; १५० क्षेपणास्त्रांचा मारा, तेल अवीव व जेरुसलेममध्ये मोठे स्फोट
लेवाजगत न्युज मुंबई:-
इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईनंतर शुक्रवारी रात्री इराणने इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. इराणने दोन टप्प्यांत जवळपास १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागली. या हल्ल्यामुळे इस्रायलच्या जेरुसलेम आणि तेल अवीव शहरांमध्ये भीषण स्फोटांचे हादरे बसले. अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, किमान १५ लोक जखमी झाले आहेत.
वृत्तसंस्था ANI ने 'द टाइम्स ऑफ इस्रायल'च्या हवाल्याने सांगितले, की इराणने इस्रायलवर हल्ला करत लांब पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाइल्स डागली. इस्रायल सैन्याने सांगितले, की हा हल्ला दोन टप्प्यांत झाला. तेल अवीवमध्ये मिसाइल्सची धडक होताच संपूर्ण शहरात धोक्याचे सायरन वाजू लागले आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले.
अमेरिकेचा हस्तक्षेप; काही क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट
अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने काही इराणी मिसाइल्स इस्रायलच्या हद्दीत पोहोचण्याआधीच नष्ट केल्या. अनेक क्षेपणास्त्रं हवेतच उडवण्यात आली, तर काही जमिनीवर आदळून फुटली. इस्रायलच्या चॅनल १२ च्या माहितीनुसार, या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी झाले असून, ८ जण किरकोळ दुखापतीने ग्रस्त आहेत. ३४ नागरिकांना स्फोटांमधून उडालेल्या बारीक धातूच्या कणांमुळे इजा झाली आहे.
तेल अवीवजवळ इमारती उद्ध्वस्त
हल्ल्याचा परिणाम तेल अवीवजवळील रमत गान परिसरात दिसून आला. येथे एका इमारतीचे काही मजले पूर्णतः उद्ध्वस्त झाले. अनेक घरं, अपार्टमेंट्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तेल अवीवच्या मध्यवर्ती भागातही हल्ल्यामुळे स्थिती भयावह झाली आहे.
खामेनेईंचा इशारा: “इस्रायलने मोठी चूक केली आहे”
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "इस्रायली सरकारने मोठी चूक केली आहे. त्यांनी गंभीर आणि बेजबाबदार कृत्य केले आहे, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील." त्यांनी हेही म्हटले की, "इराणचा सैन्यदल सज्ज आहे आणि शहीदांच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही."
संघर्ष वाढण्याची शक्यता; आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत
या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव अधिकच वाढला आहे.संयुक्त राष्ट्रसंघ आणि अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इराण व इस्रायलमधील संघर्ष आता गंभीर वळणावर पोहोचला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत