सावखेडा येथे डंपरची दुचाकीला धडक ; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी, तिघे डंपर जप्त
सावखेडा येथे डंपरची दुचाकीला धडक ; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी, तिघे डंपर जप्त
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावखेडा -रावेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ शनिवारी (दि. २१ जून २०२५) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त डंपरसह आणखी दोन संशयित डंपर जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (एमएच १९ झेड ३९९१) ने समोरून येणाऱ्या मोटारसायकल (एमएच १९ बी डब्ल्यू७३१७) ला जबर धडक दिली. यात मोटारसायकलस्वार सरफराज हबीब तडवी (वय ५३, रा. कळमोदा, ता. रावेर) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रावेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी असलेले अपघातास कारणीभूत डंपर (एमएच १९ झेड ३९९१), तसेच इतर दोन संशयित डंपर (एमएच १९ झेड ५३०१ व एमएच १९ सी वाय ०१७३) जप्त केले आहेत. ही वाहने रावेर तहसील कार्यालयात पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान, या डंपरचा उपयोग खनिज वाहतुकीसाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधित डंपर चालक व मालकांविरोधात पोलीस व महसूल विभाग कारवाई करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत