आमोद्याजवळ अपघातांची मालिका – केवळ ६० मीटर अंतरात ४ वाहनांना अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
ट्रॅव्हल्समधील प्रवासी बचावले, पिकअप कलंडली, टँकर शेतात घुसला!
आमोद्याजवळ अपघातांची मालिका – केवळ ६० मीटर अंतरात ४ वाहनांना अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
लेवाजगत न्यूज आमोदा :- मोर नदीजवळील वळण रस्त्याने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. रविवारी सकाळी केवळ चार तासांत या ठिकाणी तब्बल चार वाहनांना अपघात झाले. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत ६० मीटर अंतरावर ही मालिका घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाले आहेत.
या ठिकाणी गेल्या महिन्याभरात सुमारे २० लहान-मोठे अपघात झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा फलक व गतिरोधक लावले, मात्र ते चुकीच्या जागी टाकल्याचे निदर्शनास आले आहे.
ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी थोडक्यात बचावले
रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास इंदूरहून भुसावळकडे जाणारी प्रवासी बस (एम.पी. ४६ पी ९०९०) पावसात ब्रेक मारल्यानंतर चाक घसरल्याने थेट रस्त्याच्या काठावर जाऊन मातीत रुतली. गाडी दहा फूट खड्ड्यात गेली असती तर मोठा अपघात झाला असता. बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
पिकअप पलटी, टँकर शेतात घुसला
दुसऱ्या अपघातात बोलेरो पिकअप (एम.एच.२८ बी.बी. ६८२५) फैजपूरहून येत असताना ब्रेक लागल्यानंतर गाडी रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. चालक किरकोळ जखमी झाला. याचवेळी भारत पेट्रोलियमचा टँकर (एमएच ४१ जी ८५००) देखील ब्रेक लागूनही रस्त्यावरून सरकत थेट शेतात जाऊन थांबला. सुदैवाने या वेळी समोरून कोणतेही वाहन आले नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,वळणाच्या अगोदर तीन-चार योग्य ठिकाणी गतिरोधक टाकावेत,रस्त्यावर स्पष्ट पांढऱ्या रेडियम पट्ट्यांची रेखाटन करावे,सुरक्षेचे फलक योग्य उंचीवर व ठिकाणी लावावेत
मोर नदी परिसरातील वळणाचा रस्ता अपघातप्रवण बनत चालला आहे. प्रशासनाने त्वरीत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत