सोनारपाडा औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना : यंत्राचा शॉक लागून महिला कामगाराचा मृत्यू
सोनारपाडा औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना : यंत्राचा शॉक लागून महिला कामगाराचा मृत्यू
लेवाजगत न्यूज डोंबिवली :- डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा भागात असलेल्या सद्गुरू कोटिंग या पावडर वेष्टन कारखान्यात गुरुवारी सकाळी काम करताना एका महिला कामगाराचा यंत्रातून विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
अक्षता अजय जाधव (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून त्या डोंबिवलीच्या कृष्णावाडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्या गेल्या काही वर्षांपासून सद्गुरू कोटिंग या कंपनीत काम करत होत्या.
दररोजप्रमाणे गुरुवारी सकाळीही अक्षता जाधव आपल्या सहकाऱ्यांसोबत यंत्रावर पावडर वेष्टनचे काम करत असताना अचानक यंत्रामधून विद्युत प्रवाह आल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. त्या घटनास्थळीच बेशुद्ध झाल्या. तत्काळ त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत प्राथमिक माहिती घेतली. अमृत वाघमारे या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सद्गुरू कोटिंग कंपनीत यंत्रसामग्री असून, सुरक्षा उपाययोजनाही असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तरीही ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत