धुळ्यातील जोडप्याची चिपळूणमध्ये आत्महत्या
पावसाळी पर्यटनाचा काळा दिवस: धुळ्यातील जोडप्याची चिपळूणमध्ये आत्महत्या
लेवाजगत न्यूज चिपळूण, रत्नागिरी –
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका तरुण आणि तरुणीने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गांधेश्वर मंदिर परिसरात घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या कोकणात मुसळधार पावसामुळे निसर्गसौंदर्य बहरले आहे. नद्या, धबधबे आणि हिरवळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ निर्माण करत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या एनडीआरएफचे जवान मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. दोघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, पर्यटकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून, नद्यांजवळ आणि धबधब्यांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत