आमोदा येथे अपघातांच्या मालिकेवर आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज -रात्री उशिरापर्यंत उपाययोजना सुरू
आमोदा येथे अपघातांच्या मालिकेवर आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज -रात्री उशिरापर्यंत उपाययोजना सुरू
महामार्गावर आतापर्यंत ३० छोटे-मोठे अपघात – ग्रामस्थांत संताप
लेवाजगत न्यूज आमोदा (प्रतिनिधी) –आमोदा परिसरातील महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून, आतापर्यंत ३० छोटे-मोठे अपघात घडले आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी,वाहन धारक ,प्रवाशी ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आणि आमदार अमोल जावळे यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला जाग आली असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे काम हाती घेण्यात आले.
श्री गणेश ट्रॅव्हल व दोन गंभीर अपघातांनंतर परिस्थिती अधिकच भयावह झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना खडसावत, उशिरा का होईना, पण तातडीने कृती करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
याअंतर्गत, सोमवारी रात्री उशिरापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रबलिंग स्पीड ब्रेकर, मोठे सूचना फलक, तसेच मोर नदी पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
या कामावर सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हेमंत महाजन स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. गावातील अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी हजर राहून कामाचे निरीक्षण करत होते.
गेल्या काही आठवड्यांत या महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये काहींना जीवही गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीदेखील अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या, याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
प्रशासनाच्या या उशिरा सुरू झालेल्या कृतींमुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या उपाययोजनांचे काटेकोर पालन व देखभाल झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत