विठ्ठलनामात तल्लीन झाल्या मणिबेन शाह महाविद्यालयातील विद्यार्थिनी-पर्यावरण वारीत रंगला भक्तिरसाचा उत्सव
विठ्ठलनामात तल्लीन झाल्या मणिबेन शाह महाविद्यालयातील विद्यार्थिनी-पर्यावरण वारीत रंगला भक्तिरसाचा उत्सव
लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आषाढी वारी म्हणजे भक्तिरसाची गंगाच! वारकरी संप्रदायाच्या या चैतन्यरूपी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी आणि पंढरीच्या द्वारी विठूरायाला भेटण्याच्या ओढीने श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी ‘विठ्ठलमय पर्यावरण वारीत’ रंगून गेल्या.
शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी, आषाढी एकादशी निमित्ताने मराठी विभाग, समाजशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रीन क्लब आणि नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी यांच्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थिनींनी स्वरचित कविता, समूहगायन, नृत्य आणि गाणी सादर करत भक्तिरसात रंग भरले. या सादरीकरणांनंतर मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी "वारकरी संप्रदाय आणि पर्यावरण" या विषयावर विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
त्यानंतर, विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत, तुळशी वृंदावन हाती घेत, टाळ-लेझीमच्या गजरात संपूर्ण महाविद्यालयाच्या प्रांगणात विठूच्या नामस्मरणात हरखून गेलेल्या वातावरणात पर्यावरणाची वारी साकारली. ही वारी अनुभवताना महाविद्यालय परिसर भक्तिभावाने न्हाल्यासारखा भासला.
या विशेष उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना सांगितले की, "संतांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पर्यावरणपूरक वार्यांचे आयोजन महाविद्यालयात होणे ही काळाची गरज आहे."
कला शाखा प्रमुख व ग्रीन क्लब समन्वयक डॉ. हिना शाह यांनीही विद्यार्थिनींच्या सर्जनशील सहभागाचे कौतुक करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन कु. मनाली मणचेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रश्मी शेट्ये तुपे यांनी केले.
या भक्तिभावाने भरलेल्या कार्यक्रमात आणि पर्यावरण वारीत विद्यार्थिनींसह महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत