भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ‘ॲक्सिओम-४’ मोहिमेतील चारही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतले
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ‘ॲक्सिओम-४’ मोहिमेतील चारही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतले
कॅलिफोर्नियातील समुद्रात यशस्वी लँडिंग; शुक्लांच्या आई-वडिलांना अनावर झाले आनंदाश्रू
लेवाजगत न्यूज | १५ जुलै २०२५-भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह ‘ॲक्सिओम-४’ या खासगी अंतराळ मोहिमेतील चारही अंतराळवीरांनी आज पृथ्वीवर यशस्वीरित्या पुनरागमन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवसांचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर, त्यांचं अंतराळयान कॅलिफोर्नियातील एका समुद्रात भारतीय वेळेनुसार दुपारी यशस्वीरित्या लँड झालं.
१४ जुलै रोजी सायंकाळी ४.५० वाजता त्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी प्रवास सुरू केला होता. आजच्या लँडिंगनंतर या अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून प्रारंभिक माहितीप्रमाणे सर्व जण पूर्णपणे सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या स्थिर आहेत.
शुक्ला यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
या यशस्वी मोहिमेमुळे संपूर्ण भारतभरून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांनीही भावना अनावर करत आनंदाश्रूंनी त्यांचं स्वागत केलं. मुलाचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांना लाभ झाला.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऐतिहासिक क्षणावर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत अभिमान व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की –
“ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेवरून परतण्याबद्दल त्यांचं स्वागत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. हे भारताच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचं पाऊल आहे.”
निरोपाच्या भाषणात शुक्ला भावुक
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला भावुक झाले होते. आपल्या निरोपाच्या भाषणात त्यांनी सांगितले –
“हा एक अविश्वसनीय प्रवास होता. माझ्या सहप्रवाशांमुळे तो आणखी अद्भुत झाला. वरून भारत खूपच सुंदर आणि प्रेरणादायी दिसतो. आजचा भारत महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेला आणि अभिमानास्पद वाटतो.”
त्यांनी पुढे हिंदीतून बोलताना नमूद केलं –
“माझा हा प्रवास संपत असला, तरी आपला ‘ह्यूमन स्पेस मिशन’चा प्रवास अजून खूप लांबचा आहे. पण जर आपण निर्धार केला, तर अशक्य काहीही नाही.”
"आजचा भारतही ‘सारे जहाँ से अच्छा’"
शुक्ला यांनी राकेश शर्मा यांच्या प्रसिद्ध उत्तराचा दाखला देत म्हटलं –
“आजचा भारत अंतराळातून पाहताना निर्भीड, आत्मविश्वासू आणि पुढे जाण्याची क्षमता असलेला दिसतो. त्यामुळे मी ही ठामपणे म्हणतो – आजचा भारतही ‘सारे जहाँ से अच्छा’ आहे.”
ही मोहीम भारताच्या अंतराळ संशोधनात केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर प्रेरणादायी पर्व ठरली आहे. लवकरच शुभांशू शुक्ला भारतात परत येणार असून त्यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत