धावत्या बसमध्ये प्रसूती, त्यानंतर नवजात बाळ बाहेर फेकल्याची संतापजनक घटना; पती-पत्नी ताब्यात
धावत्या बसमध्ये प्रसूती, त्यानंतर नवजात बाळ बाहेर फेकल्याची संतापजनक घटना; पती-पत्नी ताब्यात
लेवाजगत न्यूज, परभणी –मंगळवारी (दि. १५ जुलै) सकाळी परभणी जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. एका धावत्या खासगी बसमध्ये प्रसूती झाल्यानंतर एका महिलेनं नवजात बाळाला थेट बसबाहेर फेकून दिलं. या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला ताब्यात घेतले असून, ते दोघेही पती-पत्नी असल्याचा दावा करत आहेत.
ही घटना पुण्याहून परभणीकडे येणाऱ्या संत प्रयाग ट्रॅव्हल्स या खासगी बसमध्ये घडली. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बस पाथरी ते सेलू मार्गावरील देवनांदरा शिवारात असताना एका प्रवाशाने अचानक बसमधून बाहेर काहीतरी फेकल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो नवजात अर्भक असल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पाथरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि नवजात बालक पुरुष जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ बसचा माग काढण्यात आला आणि ती बस परभणी शहरातील जुन्या जिल्हा परिषद परिसरात थांबवण्यात आली.
बसची तपासणी करून पोलिसांनी एक महिला आणि एक पुरुष यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेची बसमध्येच प्रसूती झाल्याचे समोर आले असून, घाबरून तिने नवजात बाळ बाहेर फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या हे दोघे पाथरी पोलिस ठाण्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. नवजात अर्भक सुरक्षित आहे, मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे का, याविषयी अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.
या घटनेच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोखंडे, थोरे, वाघ, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस सर्व शक्यतेचा विचार करून तपास करत आहेत, कारण कोणतीही महिला सहजतेने असे पाऊल उचलत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, अर्भकाच्या सुरक्षेसोबतच संबंधित महिलेच्या मानसिक स्थितीचा तपास करणेही आवश्यक ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत