बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांनी परिसर केला झाडून तपास
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांनी परिसर केला झाडून तपास
लेवाजगत न्यूज मुंबई, ता. १५ जुलै – मुंबईतील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. ही धमकी बीएसईच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाली असून, सोमवारी दुपारी ३ वाजता स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता.
धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी तत्काळ फिरोज टॉवर परिसरात धाव घेत सुरक्षा कडेकोट केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) इमारत व संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली. मात्र तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कार्यालय बंद असल्यामुळे संबंधित ईमेल बीएसईच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास सोमवारी सकाळी आला. ईमेलमध्ये म्हटले होते की, "फिरोज टॉवर इमारतीत चार आरडीएक्स IED बॉम्ब ठेवण्यात आले असून त्यांचा स्फोट दुपारी ३ वाजता होईल." या इशाऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने आपत्कालीन प्रतिसाद सुरू झाला.
या प्रकरणी रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध BNS कलम 351(1)(ब), 353(2), 351(3) व 351(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढत असून, धमकी कोणाकडून व कुठून आली, हे शोधण्यासाठी सायबर पोलिस विभागाची मदत घेतली जात आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या प्रकाराची गांभीर्याने चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत