पुस्तकाचे शीर्षक -ततं ततं,लेखक -डॉ अरविंद नारखेडे ,समीक्षा-सुनिता नारखेडे(येवले) -
पुस्तकाचे शीर्षक :- ततं ततं
लेखक :- डॉ अरविंद नारखेडे.
राज्यपुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक
प्रकाशक :- प्रभव प्रकाशन
४, उदयन प्लाझा, देवेंद्र नगर, जळगाव
प्रकाशन दिनांक :- १०/ ०९/ २०२४
पृष्ठसंख्या :- ४०
जेष्ठ लेखक आ. डॉ. अरविंद नारखेडे (ए. के. नारखेडे सर)" यांची प्रमाणित मराठी आणि लेवा गणबोलीतून अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. " ततं ततं " हां त्यांचा नाट्यछटा संग्रह गणबोली अभ्यासक व सर्वच रसिक वाचकांसाठी मेजवानी ठरणारा आहे. या पुस्तकाला आ. प्रभातदादा चौधरी सर (खिरोदा) यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. विशेष बाब म्हणजे ही प्रस्तावना गोड लेवा गणबोली भाषेतून लिहिलेली आहे. हे पुस्तक सरांनी दयानंद व प्रभव या दोन्ही पणतूंना अर्पण केलेले आहे. लेवा गणबोलीतून लिखणाचा हा वसा अखंड पुढे चालवून तिला समृद्ध बनविण्यासाठी जणू नव्या पिढीला कानमंत्रच याद्वारे दिला जात आहे. गणबोलीतून नव्याने लेखन करणाऱ्या अनेकांना सर मनापासून मार्गदर्शन करीत असतातच. खरं म्हणजे नारखेडे सरांसारख्या जेष्ठ साहित्यिकाच्या एका पुस्तकाची समीक्षा लिखिण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजते.
या पुस्तकात एकूण अकरा नाटयछटा असून अ. कृ. नारखेडे यांचे नाट्यछटालेखन- एक आकलन हा डॉ प्रशांत धांडे लिखित विस्तृत लेखही यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. ज्याचा फायदा पुढे लेवा गणबोलीतून नव्याने नाट्यछटा लिहिणाऱ्यांना नक्की होईल.शालेय नाट्यछटा स्पर्धांमधून मुलांना लेवा गणबोली भाषेतून सादर करता येतील अशा या नाट्यछटा आहेत. बोली भाषा टिकवायची असेल, तिला समृद्ध करायची असेल तर नव्या पिढीला तिची ओळख, अभिमान असायलाच हवा.यासाठी हे पुस्तक घरा घरात आणि शाळा शळांपर्यंत पोहोचले पाहिजे. या सर्व नाट्यछटा वाचतांना प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा साकार होतो. हिच सफलतेची सर्वात मोठी बाब आहे असे मला वाटते.
"आन् म्हने मी सायेबाची बायको" या पहिल्याच नाटयछटेतून सारखे उसनं काहीतरी मागणारी पण गावभर सायबीन म्हणून मिरवणारी अस्सल गावराण शेजारीण आपल्याला ओळखीची वाटते. त्याचप्रमाणे " नही तं उगानीच बोभाटा करत सुटसान " मधील भोळीन भावजय कडचा चहा सर्वांना हसवता हसवता तोंड उतरवून टाकतो. स्वभावाचे पैलू यातून दिसून येतात.
"आताच्या आता तोडीसन" , "हेडसर येयाच्या अगोदर", " अभ्यासाशिवाय ..." , " जय रसायन ! जय इज्ञान !!" , " आता शाया घरीच" अशा पाच नाट्यछटा या शाळा, शिक्षक , विषय आणि या सर्वांशी निगडीत बाबींवर आधारीत आहेत. मनोरंजना सोबत त्या डोळ्यात अंजनही घालतात. स्वतः शिक्षकी पेशातील असल्याने आलेल्या अनुभवांचा प्रभाव, या क्षेत्रावरील त्यांच्या आतोनात प्रेमाचाही प्रभाव यांत सहजतेने डोकावतांना आपणास जाणवतो.
नाटकी, दुटप्पी, दांभिक, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण' अशांचे व्यक्तिचित्रण हे " जानं कसं काय जमीन ते खरं!" ," इकारापासून...!" आणि " कसं सूर्यपरकास्यासारकं " या तीन नाट्यछटांमधून हुबेहूब समोर येते. तर " मनगट नही, मन टिचलं!" यातून फ्रॅक्चर झालेल्या त्या बाईचे कोते विचार, इतरांना हीन लेखण्याची वृत्ती वाचकांसमोर येते.
या सर्व नाट्यछटांमधील भाषेत सहजपणे येणारा आपुलकीचा गोडवा असल्याने तो खिळवून तर ठेवतोच शिवाय ताण कमी करून आपणास टवटवीत करतो. त्यामुळेच नकळतच प्रत्येक वाचकाच्या ओठंवर स्मितहास्य उमटल्याशिवाय राहाणार नाही. यातील भाषाशैली ओघवती असून ती मनाची पकड घेणारी आहे. केवळ एकदा वाचून रसिकाचे मन भरतं नाही. पुन्हा पुन्हा वाचून वाचकाला पुस्तकाच्या नावाप्रमाणे ततं ततं व्हावेसे वाटते. नाट्यछटांची लांबी बेताची असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्यास आकर्षण मूल्य अधिक वाढून त्या सादर करण्याची संधी मुलांना मिळेल. वाचकांप्रमाणे सादरीकरणातही याला उत्तम दाद मिळेल याबद्दल मला खात्री वाटते. याचप्रमाणे यातून मनोरंजना सोबतच उत्तम आचार, विचार, वर्तन इ. संबंधी ज्ञान प्राप्त होते.
विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, कलाकारांना आणि सर्वच स्तरातील रसिक वाचाकांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. लेवा गणबोलीच्या अभ्यासकांसाठी तसेच नवोदित लेखकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात तीळमात्र ही शंका नाही. प्रत्येकाने हे पुस्तक जरूर जरूर वाचावे असेच आहे. वाचतांना यातील प्रत्येक प्रसंग जणू आपल्यासमोरच घडत आहे , आपण ही तिथुनच फेरफटका मारत ऐकतोय नि आनंद घेतोय असेच वाटते. अशा अस्सलं ग्रामीण आणि हृदयाचा ठावं घेणाऱ्या लेवा गणबोली भाषेतील या नाट्यछटा आपल्या शैलीने मन जिंकून घेतात. "ततं ततं " म्हणजे ताजे ताजे, टवटवीत, तजेलेदार . नावाप्रमाणेच हा संग्रह जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा आपणास "ततं ततं" करेल. मरगळ घालवून ओठांवर हास्य फुलवेल. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी हा संग्रह वाचावा व इतरांपर्यंत पोहचवावा आणि सर्व ततं ततं व्हावे असे आग्रहाने सांगावेसे वाटते.
- सुनिता नारखेडे-येवले
जळगाव
९४२३७७२४७७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत