गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू
गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू
लेवाजगत न्यूज वडोदरा-गुजरातच्या बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्य़े बुधवारी पहाटे एक जीर्ण झालेला पूल कोसळला आहे. त्यामुळे अनेक वाहने महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, गुजरातच्या पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे हा पूल होता. हा पूल कोसळल्याच्या घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये एक टँकर तुटलेल्या पुलावरून खाली पडताना लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. तसेच नदीत अडकलेली एक महिला तिच्या मुलासाठी मदतीसाठी ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. तिचा मुलगा पाण्यात पडलेल्या एका गाडीत अडकलेला दिसत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
या घटनेबाबत बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “आम्ही किरकोळ जखमी झालेल्या पाच जणांना वाचवलं आहे. दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच या घटनेतील मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. बचाव कार्य सुरू आहे. मात्र, या घटनेबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या पुलाचा एक भाग अचानक खाली कोसळल्यामुळे दोन ट्रक, एक इको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटो-रिक्षा हे वाहने नदीत पडली आहेत”, असं जिल्हाधिकारी धामेलिया यांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच ही घटना घडली तेथे नदीचा सर्वात खोल भाग नाही. त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरु आहे. तसेच या घटनेतील मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यात येत आहे. जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बरोबरच काही जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी धामेलिया यांनी सांगितली.
दरम्यान, “४३ वर्षे जुना हा पूल होता. तसेच गेल्या वर्षी हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. मात्र, ही घटना घडल्यानंतर रस्ते आणि पूल विभागाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुलाची तपासणी आणि घटनेची चौकशी करणार आहोत”, अशी माहिती जिल्हाधिकारी धामेलिया यांनी सांगितली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत