राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वसाहतवादी विचारांचा बीमोड; ‘लोकल टू ग्लोबल’ उद्दिष्टांवर भर – डॉ. आर. टी. बेद्रे यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वसाहतवादी विचारांचा बीमोड; ‘लोकल टू ग्लोबल’ उद्दिष्टांवर भर – डॉ. आर. टी. बेद्रे यांचे प्रतिपादन
लेवाजगत न्यूज फैजपूर (ता. यावल) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अभ्यासपूर्ण असून, भारतीय समाजावरील वसाहतवादी प्रभावाचे निर्मूलन करीत भारतीय ज्ञान, परंपरा व संस्कृतीचा जागर करणारे धोरण आहे, असे प्रतिपादन डॉ. आर. टी. बेद्रे, संचालक, मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, डॉ. हरीसिंग गौर विश्वविद्यालय, सागर (म.प्र.) यांनी केले.
ते धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : उद्दिष्टे, अंमलबजावणी आणि आव्हाने या विषयावर १५ जुलै रोजी आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. पी. पाटील (सदस्य, तापी परिसर विद्या मंडळ), प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. मनोहर सुरवाडे, प्रा. डॉ. कल्पना पाटील, समन्वयक डॉ. मारोती जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत डॉ. जाधव यांनी शैक्षणिक धोरणाचा ऐतिहासिक मागोवा घेत सांगितले की, १९६८ साली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पहिले शैक्षणिक धोरण आले. त्यात स्त्री शिक्षण, संरक्षण व साक्षरतेवर भर होता. १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात दुसरे धोरण राबविण्यात आले, ज्यामुळे भारत तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे गेला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०२० मध्ये तिसरे धोरण आले असून, ते भारतीय मूल्याधिष्ठित, ज्ञानकेंद्रित व राष्ट्रभिमान जागविणारे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बेद्रे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील क्रेडिट बेस्ड सिस्टीम, बहुभाषिक शिक्षण, बहुआयामी अभ्यासक्रम रचना, आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन यांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी प्राचीन काळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांचा संदर्भ देत सांगितले की, भारतीय शिक्षण परंपरेचे पुनरुज्जीवन हेच या धोरणाचे गाभा आहे.
तसेच, भारत सरकार शिक्षण क्षेत्रावर वाढीव खर्च करत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय विद्यापीठे स्पर्धात्मक बनवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी आकडेवारीसह दिली. ब्रिटिश काळातील लॉर्ड मेकॉले यांच्या शिक्षण नीतीपासून आजच्या परिवर्तनापर्यंतच्या प्रवासाचे त्यांनी विश्लेषण केले.
या कार्यशाळेमुळे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत झाली असून, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी धोरणाच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन डॉ. बेद्रे यांनी केले.
कार्यक्रमात महाविद्यालयात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या दहा दिवसांच्या ऑनलाईन 'एनईपी ओरिएंटेशन व सेंसिटायझेशन प्रोग्रॅम' बद्दल महाविद्यालयाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. पूजा महाजन यांनी तर आभार डॉ. पल्लवी भंगाळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, इंग्रजी विभाग प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. शेखर महाजन, अमित गारसे, सिद्धार्थ तायडे व विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत