लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सचा ७ वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला
लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सचा ७ वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला
उरण (प्रतिनिधी – सुनिल ठाकूर)
लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सचा सातवा पदग्रहण समारंभ रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सीबीडी बेलापूर येथील हॉटेल निमंत्रण येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या समारंभात नव्या नेतृत्वाने समाजसेवेच्या दिशेने नवे संकल्प घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात नंदाई माता वेलकम ग्रुपच्या मधुर सादरीकरणाने झाली. स्तवन गीत, स्वागत गीत आणि महाराष्ट्र गीताच्या प्रस्तुतीने सभागृहात एक उबदार आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. यानंतर पदग्रहण सोहळ्यास अधिकृत सुरुवात झाली.
PMJF लायन राजेश प्रजापती (माजी जिल्हा प्रांतपाल) यांच्या हस्ते लायन योगिता पाटील यांच्यासह २०२५–२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित असलेले PMJF लायन अनुप थरवानी यांनी पाच नव्या सदस्यांची दीक्षा घेऊन क्लबमध्ये नवचैतन्याचा संचार केला.
या कार्यक्रमास जिल्हा प्रांतपाल PMJF लायन एन. आर. परमेश्वरन, माजी जिल्हा प्रांतपाल MJF लायन मुकेश तनेजा, रिजन चेअरपर्सन लायन दीपक पाटील, झोन चेअरपर्सन लायन अंशु पॉल, विविध कॅबिनेट सदस्य आणि शेजारील क्लब्सचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती.
समारंभादरम्यानच क्लबने दोन सामाजिक उपक्रमांची घोषणा करून नव्या वर्षाच्या सेवाभावाला प्रारंभ केला. यामध्ये स्नेहकुंज वृद्धाश्रम येथे किराणा वाटप व कॅन्सर प्रतिबंधासाठी HPV लसीकरण मोहिमेचा समावेश आहे.
क्लबच्या नव्या ध्येयदृष्टीचा भाग म्हणून नवीन लोगो आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. "Serve With Unity – Lead With Dignity" (एकतेने सेवा – प्रतिष्ठेने नेतृत्व) हे घोषवाक्य लायन्स क्लबच्या समाजसेवेच्या बांधिलकीचे प्रतीक ठरले.
माजी अध्यक्ष लायन दत्तात्रय कोळी यांचा २०२४–२५ या वर्षातील यशस्वी कार्यकाळाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर नवनियुक्त अध्यक्षा लायन योगिता पाटील यांनी आपल्या स्वीकार भाषणात क्लबच्या आगामी कामकाजाचा आराखडा सादर केला. प्रशासनात शिस्त, LCIF साठी आर्थिक योगदान, सदस्य वाढ आणि विविध सेवा उपक्रमांची अंमलबजावणी या मुख्य बाबी त्यांनी अधोरेखित केल्या.
या नव्या कार्यकारिणीसह लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स ‘एकतेने सेवा आणि प्रतिष्ठेने नेतृत्व’ या संकल्पनेवर आधारित समाजसेवेसाठी नव्या जोमाने कार्यरत राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत