सावदा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत गोंधळ-कर्जदार सभासदांची नावे यादीतून गायब, निवडणूक पुढे ढकला अशी मागणी
सावदा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत गोंधळ-कर्जदार सभासदांची नावे यादीतून गायब, निवडणूक पुढे ढकला अशी मागणी
लेवाजगत न्यूज सावदा –सावदा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक ४ जुलैपासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया १० जुलै पर्यंत, म्हणजेच गुरुवार दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेत एक गंभीर विसंगती उघडकीस आली आहे – कर्जदार सभासदांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
या प्रकारामुळे कर्जदार सभासदांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून, अनेकांनी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, जाणूनबुजून निवडणूक प्रक्रियेपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी महाजन यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की,
"माझा यादी तयार करण्याशी काहीही संबंध नाही. ही यादी मला वरूनच प्राप्त झाली आहे."
या उत्तरामुळे सभासदांमध्ये संभ्रम अधिकच वाढला असून, यादी तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो.
कर्जदार सभासदांकडून मागणी करण्यात येत आहे की, यादीतील विसंगती दूर करून निवडणूक प्रक्रिया काही दिवसांसाठी पुढे ढकलावी व सर्व पात्र सभासदांना निवडणुकीत सहभागाची संधी द्यावी.
या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निवडणूक प्रक्रियेत कर्जदार सभासदांची नावे गायब करणारा ,मतदानाच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या राजकीय पोळी भाजणारा कोणी व्यवस्थापक असो वा चेअरमन किंवा संचालक असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व जिल्हा निबंधकांनी प्रक्रियेकडे लक्ष देऊन योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कर्जदार सभासदांमधून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत