“भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो” – अंतराळातून शुभांशू शुक्लांचा देशवासीयांसाठी भावनिक संदेश
“भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो” – अंतराळातून शुभांशू शुक्लांचा देशवासीयांसाठी भावनिक संदेश
लेवाजगत न्यूज LIVE | १४ जुलै २०२५
अंतराळातून थेट देशवासीयांना भावनिक निरोप देताना भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी पुन्हा एकदा "सारे जहाँ से अच्छा" या राकेश शर्मांच्या ऐतिहासिक उद्गाराला उजाळा दिला. १५ जुलै रोजी ते पृथ्वीवर सुखरूप परतणार आहेत.
‘ॲक्सिओम-४’ या खासगी व्यावसायिक मोहिमेच्या अंतर्गत, शुभांशू शुक्ला यांच्यासह आणखी तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेले होते. हे सर्व अंतराळवीर सोमवार, १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३५ वाजता (भारतीय वेळेनुसार) ISS वरून त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. १५ जुलै मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांचे कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ आगमन होणार आहे.
अद्भुत प्रवास... हृदयस्पर्शी निरोप
अंतराळातील या मोहिमेचा समारोप होताना, शुभांशू शुक्ला यांनी भावनांनी भरलेला निरोप दिला. ते म्हणाले,
“हा एक अविश्वसनीय प्रवास होता. मोहिमेतील सहभागी आणि तांत्रिक टीममुळे हा अनुभव अजोड ठरला.”
शेवटी हिंदीत बोलताना त्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमेच्या भविष्यासंदर्भात आशावाद व्यक्त केला –
“माझा हा प्रवास कमालीचा राहिला आहे. आता माझा प्रवास संपतोय, पण तुमचा आणि माझा प्रवास अजून खूप दूरचा आहे. आपला ह्यूमन स्पेस मिशनचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण आहे. पण जर आपण निश्चय केला तर तो पूर्णपणे शक्य आहे.”
भारताचा अंतराळातील आत्मविश्वास
भारत अंतराळातून कसा दिसतो, यावर भाष्य करताना शुक्ला यांनी राकेश शर्मा यांचं ४१ वर्षांपूर्वीचं वाक्य आठवून दिलं – “सारे जहाँ से अच्छा”.
पण यावेळी शुक्ला यांनी त्या वाक्याला अधिक व्यापक अर्थ दिला. ते म्हणाले –
“आजचा भारत स्पेसमधून महत्वाकांक्षी दिसतो, निर्भीड दिसतो, आत्मविश्वासाने भरलेला दिसतो आणि अभिमानाने तेजस्वी दिसतो. यामुळेच मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो – भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू.”
देशासाठी प्रेरणा
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ही मोठी कामगिरी असून, ISRO आणि खासगी भागीदारांच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीरांची जागतिक पातळीवरील उपस्थिती दिवसेंदिवस अधिक ठळक होत आहे.
शुभांशू शुक्ला यांच्या या यशस्वी मोहिमेने नव्या पिढीला विज्ञान, अंतराळ आणि संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत