जळगावात घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्याचा पर्दाफाश; ८० लिटर भेसळयुक्त साठा नष्ट
जळगावात घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्याचा पर्दाफाश; ८० लिटर भेसळयुक्त साठा नष्ट
लेवाजगत न्यूज, जळगाव :
जिल्ह्यात आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या भेसळयुक्त दुधाच्या विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडे या गावात सोमवारी मध्यरात्री अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ८० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी सोमनाथ आनंदा माळी (वय ३१) या तरुणास अटक करण्यात आली आहे.
खाली दिलेल्या लिंक ची पण बातमी वाचा-*"चोपडा पोलिसांचा छळकांड PSI निलंबित, भुसावळ शिक्षक बँकेत १० कोटी घोटाळा ,१६ जण अटकेत!"*
कृत्रिम रसायनांचा वापर करून तयार होत होते दूध:
दूध हे आरोग्यदायी पेय मानले जाते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती दूध पितात. मात्र, जळगाव जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा केली जात आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी विविध डेअऱ्यांवर छापे टाकून दूध नमुने तपासणीसाठी घेतले होते. काही नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आल्यानंतर संबंधितांवर कारवाई देखील करण्यात आली होती.
ही पण बातमी वाचा-महिलेचा खून : ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन >> https://www.lewajagat.com/2025/07/Police-appeal-to-identify-womans-murder.html
तथापि, या मोहिमेनंतरही भेसळ रोखली गेली नसून, भवरखेडे येथे कृत्रिम रसायनांच्या साहाय्याने बनवले जाणारे दूध विक्रीस ठेवले जात असल्याची गुप्त माहिती अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ धरणगाव पोलिसांना कळवून मध्यरात्री कारवाईसाठी पथक तयार केले.
कारवाईचा थरार आणि संशयिताची कबुली:
सदर पथकाने सोमवारी मध्यरात्री भवरखेडे येथे अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान संशयित सोमनाथ माळी हा विविध रसायने वापरून कृत्रिम दूध तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने दोष कबूल केला.
त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी आढळलेली रसायने जप्त करण्यात आली असून, भेसळयुक्त ८० लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी:
ही धाडसी कारवाई उपनिरिक्षक संतोष पवार, हवालदार वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक जितेंद्र वलटे, हवालदार रवींद्र पाटील, दीपक माळी, विष्णू बिऱ्हाडे, बाबासाहेब पाटील यांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता.
अन्न व औषध प्रशासनाचा इशारा:
दुधात भेसळ ही अत्यंत गंभीर बाब असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. यापुढे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, संपूर्ण जिल्ह्यात दूध साठ्याचे सर्वेक्षण आणि नमुना तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना आवाहन:
जिल्ह्यातील नागरिकांनी दूध खरेदी करताना सतर्क राहावे. भेसळीचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संवाददाता – लेवाजगत न्यूज, जळगाव
(बातमीसाठी संपर्क: lewajagat@gmail.com )



कोणत्याही टिप्पण्या नाहीत