मासिक पाळीच्या संशयातून शाळेतील विद्यार्थिनींवर अमानवी वागणूक-पालक संतप्त, प्राचार्य अटकेत
मासिक पाळीच्या संशयातून शाळेतील विद्यार्थिनींवर अमानवी वागणूक-पालक संतप्त, प्राचार्य अटकेत
लेवाजगत न्युज शहापूर :– शहापूरमधील एका नामांकित खासगी शाळेत घडलेला प्रकार समाजमन हादरवून टाकणारा आहे. शाळेतील स्वच्छतागृहात रक्ताचे डाग दिसल्यानंतर, मासिक पाळी कोणत्या विद्यार्थिनीला आली याचा शोध घेण्याच्या नावाखाली सहावी ते दहावीपर्यंतच्या सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींच्या गणवेशांची जबरदस्तीने तपासणी करण्यात आली, ही घटना चीड आणणारी असून, मुलींच्या मनोबलावर खोल आघात करणारी आहे.
विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी रडत रडत पालकांना सांगितल्यावर प्रकरण उघडकीस आले. यानंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर तसेच पोलीस ठाण्यासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.
शाळेतील पाण्याचा अभाव आणि असंवेदनशील वर्तन यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले. भिंतीवर दिसलेले रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवून विद्यार्थिनींना त्रास देण्यात आला, एवढेच नव्हे तर बोटांचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
ही शाळा नर्सरी ते दहावीपर्यंत असून सुमारे ६०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे व पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तातडीने हस्तक्षेप करत पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु संस्थाचालकांशी संपर्क न झाल्याने पालकांचा रोष अधिकच वाढला आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा वळवला.
शेवटी पोलिसांनी प्राचार्या व एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली असून इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडूनही प्राचार्यांविरोधात निलंबनाच्या हालचाली सुरू असून, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांनी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याचे सांगितले.
या प्रकरणामुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून मुली शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा प्रशासनाच्या बेजबाबदार, अमानवी वर्तनामुळे हा संतापाचा स्फोट झाला.
संपादकीय दृष्टिकोन:
हा प्रकार केवळ शिक्षणसंस्थेच्या अपयशाचे उदाहरण नाही, तर हा मानवी हक्कांचा भंग आहे. बालिकांच्या नैसर्गिक प्रकियेला ‘शोधून काढणे’ हे निंदनीय आहे. अशा घटकांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून शिक्षणसंस्थांमध्ये सुरक्षितता आणि संवेदनशीलता अबाधित राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत