देहविक्री प्रकरण उघडकीस :बांगलादेशी तरुणी व घरमालक महिला अटकेत
देहविक्री प्रकरण उघडकीस : बांगलादेशी तरुणी व घरमालक महिला अटकेत
लेवाजगत न्यूज जळगाव-पुण्यातील सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून देहविक्री प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीला देहविक्रीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्या घराची मालकीण असलेल्या महिलेलाही ताब्यात घेतले असून, दोघींविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पिटा कायदा, विदेशी नागरिक अधिनियम व पारपत्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन शहरात एका बांगलादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्री करुन घेतल्याची माहिती दिली होती. यावर तत्काळ कारवाई करत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी व पथकाने प्रोफेसर कॉलनीतील जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील भागात असलेल्या घरावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान पूजा आत्माराम जाधव या महिलेकडील घरात एका खोलीत २५ वर्षीय बांगलादेशी महिलेला बंदिस्त अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पिटा कायदा, विदेशी नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14/अ, पारपत्र अधिनियम 3ए व 6, तसेच BNS कलम 142 व 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत